महाराष्ट्राची आजची अवस्था बघता पंतप्रधान कौतुक करण्याची सुतराम शक्यता नाही – केशव उपाध्ये

मुंबई : ९ मे – महाराष्ट्र आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. तर दुसरीकडे भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. ‘मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता पंतप्रधान मोदी कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही’ असा दावाच भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदींनी कौतुक केल्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये वादाचा नवीन सामना रंगला आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करून महाविकास आघाडी सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे.
‘स्वःताच उदोउदो करत फिरायचं, आगा ना पिछा बोलत रहायचं, अपयश आलं की केंद्रावर ठकलायचं ही या राज्य सरकारची त्रिसूत्री आहे. सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचं’ असा टोला उपाध्ये यांनी लगावला.
‘कोरोना कमी झाला की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि वाढला की जनतेचा निष्काळजीपणा! एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती? आता घरीबसल्या मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं, सारखं पंतप्रधानानी यांच कौतुक केले, याचा नवा खेळ खेळला जातोय. मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही आणि हे सांगतं कोण, तर मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेसनोट’ असंही उपाध्ये म्हणाले.
‘आता प्रत्येक बाबतीत PR agency वापरू नका, हेच तर देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रात म्हटले आहे, मग इतके झोंबले का? शिवसेनेचा संगत-गुण राष्ट्रवादीला लागला का कोण जाणे? पण टोपेंनी जालन्यात जास्त लस दिल्याबद्दल जो खुलासा मागितला, त्यावर जयंत पाटील यांनी बोलायला हवे होते’ असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला.
‘वास्तव माहिती लपवून पंतप्रधानांकडून कौतुक करून घेतल्याच दावा करताना ’मनाचा आतला आवाज’ तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा’ असंही उपाध्ये म्हणाले.
‘येथे बिचारे नितीन राऊत असो की पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात असो की अजून त्यांच्या पत्राचीही कुणी दखल घेत नाही तरी सचिन सावंत मात्र ‘बेगाने शादी में….’ नाचत राहतात’ अशी टीकाही उपाध्ये यांनी काँग्रेसवर केली.
तर दुसरीकडे, भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पंतप्रधान मोदी महाराष्ट्र सरकारचे कौतुक करतील, अशी शक्यताच फेटाळून लावली आहे.
‘मुंबई आणि महाराष्ट्राची कोविड नियंत्रणाची परिस्थिती वाईट असताना पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या कामगिरीबद्दल कौतुक केलं असेल असं मला वाटत नाही. हा प्रयत्न हास्यास्पद आणि केविलवाणा वाटतो!’ असा दावाच दरेकर यांनी केला आहे.

Leave a Reply