ठाणे : ९ मे – पंतप्रधान निधीतून कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध झालेले व्हेटींलेटर केवळ 50 टक्के क्षमतेनेच काम करत असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून चौकशी केली जावी, अशी मागणीही श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये नवा वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत.
पीएम केयर फंडातून वाटप करण्यात आलेले व्हेंटिलेटर्स 50 टक्के क्षमतेनेच चालतात, असा निष्कर्ष डॉक्टरांच्या चर्चेतून पुढे आला आहे. ही बाब खरी असेल तर रुग्णांच्या जीवितास धोका आहे. हे व्हेंटीलेटर 100 टक्के क्षमेतने चालणारे हवेत. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य खात्याच्या निदर्शनास आणून दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे खासदार शिंदे यांना सांगितले.
ही बाब ठाणे जिल्ह्यातील डॉक्टरांच्या माध्यमातून उघड झाली आहे. केवळ ठाणे जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेनुसार चालणारे व्हेटींलेटर प्राप्त झाले आहे की, संपूर्ण राज्यात आणि देशात अशा प्रकारच्या व्हेटींलेटरचा पुरवठा केला गेला आहे, याची शहानिशा केली जावी असे शिंदे यांनी मागणी केली आहे. ज्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. नेमके किती व्हेंटिलेटर्स पंतप्रधान निधीतून पुरविले गेले आहेत, याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध होऊ शकते असेही शिंदे यांनी सांगितले.
नाशिकला पीएम केअर फंडातून 60 व्हेंटिलिटर मिळूनही ते जोडणी अभावी अजून ही बिटको रुग्णलयात धूळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. एकीकडे राज्यात प्राणरक्षक प्रणालीअभावी (व्हेंटिलेटर्स) रुग्ण मरत असताना नाशिकमध्ये प्रशासन इतक्या हलगर्जीपणाने कसे वागू शकते, असा प्रश्न विचारला जात आहे.
याबाबत मनपा आयुक्तांना जाब विचारला असता त्यांनी या सगळ्याचे खापर संबंधित कंपनीवर फोडले. त्यानंतर प्रथेप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारणही रंगले. मात्र, या सगळ्यात या व्हेंटिलेटर्सची जोडणी करुन रुग्णांचे जीव वाचवता येतील, असा विचार अद्याप प्रशासनाच्या मनात आलेला नाही.