अकोला : ९ मे – अवैधरित्या देशी दारू विक्रीसाठी दोन व्यक्तींनी अजब शक्कल लढवून साडेआठशे देशी दारूचे क्वाटर जमिनीत गाडून ठेवल्याचा प्रकार शनिवारी रात्री समोर आला आहे. यामध्ये अकोट फैल पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. हा प्रकार आगर रोडवरील एका शेतामध्ये उघडकीस आला आहे. लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये पोलिसांनी गौतम शिरसाट आणि विश्वराज भातकुले यास अटक केली आहे. विशेष म्हणजे, हे देशी दारूचे बॉक्स शेतात दूरदूर जमिनीत गाडण्यात आले होते.
उगवा येथील आगर रोडवरील शेतामध्ये गौतम शिरसाट व विश्वराज भातकुले यांनी शेतातील झोपडीजवळ देशी दारूचे बॉक्स लपवून ठेवत आहे. त्याआधारे शेतातील झोपडीजवळ जाऊन अकोट फैल पोलिसांनी पाहणी केली असता दोघे शेतातील मातीमध्ये देशी दारुचे बॉक्स लपवून त्यावर माती टाकताना दिसले. त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. गौतम नारायण शिरसाट व विश्र्वराज सुरेंद्र भातकूले यांच्याजवळून 180 एमएलचे 300 नग देशी दारू किंमत 16 हजार 500 रुपये जप्त केली. 90 एमएलचे 550 देशी दारूचे नग किंमत 17 हजार 400 रुपये यासह दुचाकी 55 हजार रुपये आणि 12 हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण एक लाख 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जमिनीत देशीदारूचे क्वाटर गाढुन ठेवल्याचा प्रकार पोलिसांनी समोर आणल्यानंतर पोलिस ही चक्रावून गेले. चोरीची ही पध्दत नवीन असल्याने पोलिसांनी या दोघांना चांगलाच प्रसाद दिला. त्यांनी याआधी किती माल विकला, केव्हापासून विकत आहेत, याची माहिती ही घेतली. ही कारवाई पोलिस निरीक्षक महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
शेतात दूरवर खड्डे खोदून ठेवले बॉक्सआगर रोडवर असलेल्या शेतातील झोपडीजवळ खड्डे खोदून त्यात दारूच्या बॉटल्सचे बॉक्स ठेवण्यात आले होते. हे खड्डेही दूरदूर करण्यात आले होते. तर पोत्यामध्ये ही दारूच्या बॉटल्स भरून ठेवण्यात आल्या होत्या. अशी नामी शक्कल या देशीदारू विक्रेत्यांनी लढविली होती.