अकोला : ७ मे – सध्या जगभरात कहर करणारा कोरोना एका गावात अद्यापही पोहचू शकलेला नाही. असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. अकोल्यातील बहिरखेड गावातील ग्रामस्थांनी गेल्या वर्षभरापासून कोरोनाला वेशिवरच थांबवलय.
जेमतेम साडेचारशे लोकवस्ती असलेल्या अकोल्याच्या बार्शी-टाकळी तालुक्यातील बहिरखेड गाव म्हणजे साधीसुधी शेती आणि मजुरी करणारी माणसं. सगळं सुरळीत सुरू असताना जगभरात अचानक कोरोना महामारी आली आणि सगळं बदलून टाकलं. गेल्यावर्षी आलेल्या कोरोनानं अनेकांचे परिवार उद्ध्वस्त केले. ही महामारी आपल्या गावात येऊ नये म्हणून बहिरखेड गावच्या गावकऱ्यांनी कंबर कसली. वर्ष उलटून गेलं तरी बहिरखेड गावाने कोरोना महामारीला वेशीवर रोखण्यात यश मिळवलं आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून ग्रामस्थांच्या एकजुटीने कोरोनाला गावात प्रवेश करूच दिला नाही. नियमांचे पालन करून ग्रामस्थांनी गावाला कोरोनापासून दूर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या वर्षभरापासून गावात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं वैद्यकीय अधिकारी सांगतात. गेल्या वर्षभरापूर्वी कोरोनाने विदर्भात एन्ट्री केली. तेव्हापासून लहानसे गाव फार सतर्क झाले. बहिरखेड गावचे सरपंच, तलाठी, ग्रामसेविका आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन सुरुवातीला गावबंदी केली. रस्ते, ऑटो बंद केले त्यानंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून सॅनिटायझरची फवारणी केली. गावातील लोकांना बाहेरगावी जाऊ न देणे, बाहेरगावचे पाहुणे गावात येऊ न देणे आणि गावातील एखादी व्यक्ती बाहेरगाववरून आलीच तर त्यांना गावाबाहेर विलगीकरणात ठेवण्याची सोय करून, त्यांना 15 दिवस विलगीकरणात ठेवले जाते.
बहिरखेड आणि आसपासच्या गावात ऑटोवर लाऊड स्पीकर लावून जनजागृती केली. गावातील वयोवृद्ध लोकांच्या बैठकांवर बंदी घातली, गावात फिजिकल डिस्टन्सिंग, घरा-घरामध्ये सॅनिटायझरचा वापर आदी नियम पाळल्यामुळे बहिरखेड गावात कोरोना नावाचा राक्षस प्रवेश करू शकला नाही. ग्रामस्थांची एकजुट आणि निर्णयात्मक क्षमता असल्यामुळं कोरोना सारखा महाभयंकर रोग बहिरखेड गावात प्रवेश करू शकला नाही. बहिरखेडप्रमाणे प्रत्येक गाव आणि शहरांनी सतर्कता बाळगत नियमांचे पालन केलं तर संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही.