त्या व्यक्तीची विश्वसार्हता किती हे पुणेकरांना विचारा – अजित पवार

पुणे : ७ मे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीमध्ये घुसमट होत आहे, असा दावा करणारे भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुल्लेखाने फटकारलं. “त्या व्यक्तीची विश्वासार्हता किती आहे हे पुणेकरांना विचारा” अशा शब्दात अजितदादांनी संजय काकडेंना टोला लगावला. भाजप प्रवेशापूर्वी अजित पवार यांच्याशी काकडेंचे जवळचे संबंध होते.
पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी संजय काकडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजितदादा म्हणाले. “मी पुण्यात आहे. ज्या व्यक्तीने हे स्टेटमेंट केलं, त्याची विश्वासार्हता किती आहे हे पुणेकरांना विचारा. अशा वक्तव्यांना महत्त्व देण्याची गरज नाही” म्हणत अजित पवारांनी विषय बदलला.
संजय काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं, की मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत. शिवसेना गेली 25 वर्षे युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मला वाईट वाटते, असंही काकडे म्हणाले होते.
दरम्यान, संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कालच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी हे मोठं विधान करून खळबळ उडवून दिली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काकडे यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply