वर्धा : ७ मे – करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य सुविधांच्या अभावी अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टीका केली जात होती. मात्र भाजपमधूनही खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारला घरचा आहेर देत पंतप्रधान कार्यालय काही कामाचं नसून करोनाविरोधातील लढ्याचं नेतृत्व भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे द्यावं, अशी मागणी केली. या मागणीबाबत नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
वाद आणि टीका-टिपण्णीपासून कायमच दूर राहणाऱ्या नितीन गडकरी यांनी यावेळीही करोनाविरुद्धच्या लढ्याचं नेतृत्व करण्याविषयीच्या मागणीवर थेट भाष्य करणं टाळलं आहे. याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, ‘मी काही फार महत्त्वाचं काम करत नाही. समाजात माझ्यापेक्षा जास्त चांगलं काम करणारे अनेक लोक आहेत. आपले पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी आणि इतर सर्वच सरकारी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. आपणही सर्वांनी सर्व मतभेद विसरून सामाजिक जबाबदारीतून काम करायला हवं. आम्हीही हाच प्रयत्न करत आहोत,’ असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
वर्धा येथील जेनिटिक लाईफ सायन्सेस येथे भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना नितीन गडकरी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.