कोरोना आणि मराठा आरक्षण या मुद्द्यावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा – प्रवीण दरेकरांची सूचना

मुंबई : ७ मे – करोना आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांवर विशेष अधिवेशन आयोजित करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी करोना परिस्थिती हाताळण्याबाबत राज्य सरकारवर टीकाही केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य सरकारमध्ये योग्य समन्वय आणि नियंत्रणाचा अभाव असल्याने राज्यातली करोना परिस्थिती बिकट झाली असल्याची टीका दरेकर यांनी केली आहे. राज्यातल्या अनेक लसीकरण केंद्रांवर बोजवारा उडाला आहे. योग्य समन्वय आणि नियंत्रणाच्या अभावामुळेच हे झालं आहे. त्यामुळे केंद्राने कमी दिलं असं म्हणण्यात काही अर्थ नाही, असं दरेकर म्हणाले. त्याचबरोबर राज्यातली करोना परिस्थिती आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी २ ते ३ दिवसांचं विशेष अधिवेशन भरवण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.
त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये अहंकाराची भावना असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी, त्यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री वाट का पाहत आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रातील राज्य सरकारने केंद्र सरकारची सलोख्याचे वातावरण ठेवले तर करोनाग्रस्तांवरील उपचारासाठी जास्त मदत मिळेल, असा दावा काही दिवसांपूर्वीच दरेकर यांनी केला होता. सध्याच्या परिस्थितीतही केंद्र व राज्य सरकार परस्परांवर टीका करत आहेत, राजकारण करत आहेत, याकडे लक्ष वेधले असता दरेकर म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत राजकारण करणे दुर्दैवी आहे. अशा संकटकाळात कोणीही राजकारण करू नये. ना राज्य सरकारने ना आम्ही. परंतु महाराष्ट्रातील सरकार प्रत्येक वेळेला अपयश झाकण्यासाठी केंद्रावर जबाबदारी ढकलत आहे असा आरोपही दरेकर यांनी केला होता.

Leave a Reply