वर्धा : ६ मे – राज्यात एकीकडे कोरोनावर प्रभावी पडणाऱ्या रेमडेसिव्हीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शन निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी दरदिवशी 30 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन बनवण्याचे लक्ष्य आहे. विशेष म्हणजे वर्ध्यातील या कंपनीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परवाना मिळवून दिला आहे.
वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्मिती करण्यात येणार आहे. नुकतंच नितीन गडकरी यांनी वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब कंपनीचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, खासदार रामदास तडस उपस्थितीत होते.
नितीन गडकरी यांनी रेमडेसिव्हीर उत्पादन करणाऱ्या जेनेटिक सायन्स कंपनीचा आढावा घेतला. तसेच याचे उद्धाटन नितीन गडकरींचे हस्ते करण्यात आले आहे. त्यासोबतच जेनेटिक सायन्स लॅब कंपनीचे संचालक डॉ.महेंद्र क्षीरसागर यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.
दरम्यान काही दिवसापूर्वी राज्यातील रेमडेसिव्हीरचा तुटवडा जाणवत होता. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी जेनेटिक सायन्स लॅबला रेमडेसिव्हीर उत्पादन करण्याची परवानगी मिळवून दिली. नितीन गडकरींच्या पाठपुराव्याने या ठिकाणी रेमडेसिव्हीरचे उत्पादन करण्यात येणार आहे. तसेच जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये 30 हजार बनवण्याचा लक्ष्य आहे. हैदराबाद येथील हेट्रा कंपनीकडून सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफसायन्सला उसणवार तत्वावर निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे.
महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले होते . कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन पाठवण्यात मिळाली होती.