नागपूर : ६ मे – नागपूर शहरातील कळमना पोलिस ठाणे हद्दीत मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना पुढे आली आहे. घरीच सोबत दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून एका मित्राने त्याच्याच मित्रावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. याप्रकरणी पोलिसांनी प्राप्त तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे. निरंजन ऊर्फ गोलू अब्रू वर्मा (वय ३0), रा. गुलशननगर, राम मंदिरजवळ, नागपूर असे मृतकाचे तर गोलू ऊर्फ समालिया राय शाहू (वय ३0), गुलशननगर, राम मंदिरजवळ, नागपूर असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक निरंजन वर्मा हा हातमजुरीच्या कामावर आहे. तर आरोपी गोलू शाहू हा टेम्पो चालकाचे काम करतो. हे दोघेही मित्र असून एकमेकाच्या शेजारीच राहायला आहेत. कोरोना संक्रमणामुळे काम बंद असल्यामुळे सध्या ते रिकामेच होते. दरम्यान, ४ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गोलू शाहू हा घरी एकटाच होता. यावेळी त्याने निरंजनला घरी बोलावून घेतले. दोघांनी पैसे मिळवून दारू आणली आणि पित बसले. दारू पिऊन दोघांनीही जेवण केले. मात्र, दारूची झिंग चांगलीच चढल्यानंतर काही वेळानंतर निरंजन वर्मा हा घरी जाण्यासाठी निघाला. यावेळी गोलू शाहूने त्याला अडविले आणि बसण्यास सांगितले. यावेळी दोघांमध्ये चांगलीच ओढाताण सुरू झाली. दरम्यान, दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर गोलू शाहू निरंजनाला घरी जाऊ न देण्यावर अडून असल्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी गोलू शाहूने घरातील धारदार शस्त्राने निरंजनच्या डोक्यावर, तोंडावर तसेच कानाच्या मागे वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. काही वेळातच त्याचा घटनास्थळीच निरंजनचा मृत्यू झाला. घटनेनंतर गोलू शाहू घर बंद करून पळून गेला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मेयोमध्ये पाठविला. याप्रकरणी फिर्यादी शेखर अब्रू वर्मा (वय २१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३0२ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे.