चंद्रपूर : ६ मे – चंद्रपूर महानगरातील प्रत्येक झोनमध्ये कोरोना केअर केंद्राची तातडीने स्थापना करावी, जेणेकरून संक्रमित कुटुंबियांना या केंद्रावर रुग्णांना भरती करून त्यांच्यावर योग्य देखरेख ठेवणे सोईचे होईल. महानगरपालिका प्रशासन गतवर्षीच्या तुलनेत कमी पडत असल्याने जबाबदार वरिष्ठ अधिकार्यांनी संक्रमितांची साखळी तोडण्यासाठी समोर यावे, अशी सूचना माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांची प्रत्यक्ष भेट घेवून केली.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा संक्रमितांची संख्या 4 पटीने वाढली असतानासुध्दा कोरोना केअर केंद्र वाढले नाही. रुग्णांना सेवा देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असताना या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल अहिर यांनी नाराजी व्यक्त केली. मनपातील आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, आरोग्य अधिकारी आदींची सेवा घेवून घराघरातील कोरोना रुग्णांना केंद्रावर ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी सूचनाही केली. ज्यांची घरे लहान आहेत तेथील संक्रमितांची साखळी तुटू शकत नाही, हे आपणही मान्य करीत असताना अशा संकटकाळात महानगरपालिकेची भुमिका मागील वर्षीपेक्षा निरुत्साही व कमतरता भासणारी वाटते, व्यवस्थेचा व गांभीर्याचा अभाव दिसतो, असेही अहिर म्हणाले.
लसीकरणासाठी नागरिकांची होत असलेली वणवण पाहता मनपाने लसीकरण केंद्राची वाढ करावी, अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. या मागणीसाठी बाळू कोतपल्लीवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ अहिर यांना भेटले होते. याप्रसंगी आयुक्तासह डॉ. खंडारे, मनपा गटनेते वसंता देशमुख, प्रदीप किरमे, सचिन कोतपल्लीवार आदी उपस्थित होते.