रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणारा आरोपी पोलीस बंदोबस्तातून फरार

नागपूर : ५ मे – रेमडेसिव्हिरचा काळाबाजार प्रकरणात अटकेतील आरोपी फरार झाल्याची खळबळजनक माहिती मंगळवारी उशीरा रात्री समोर आली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
काळाबाजार प्रकरणात दोन दिवसांपूर्वी पाचपावली पोलिसांनी सापळा रचून औषध विक्रेता उबेद राजा इकरामुल हक (वय ३१ रा. विनोबा भावेनगर) व त्याचा मित्र अहमद हुसेन जुल्फीकार हुसेन ( वय ३१ रा. अवस्थीनगर) या दोघांना अटक केली. पोलिसांनी दोघांकडून दोन इंजेक्शन जप्त केले. दोघांची पोलिस कोठडी घेतली. मंगळवारी रात्री पोलिस दोघांची चौकशी करीत होते. याचदरम्यान पोलिसांच्या हातावर तुरी देऊन उबेद हा पसार झाला.
पोलिस स्टेशनमधून उबेद पसार झाल्याचे कळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. उबेद हा पोलिस कोठडीत असताना पसार झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांना दिली. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता सुरूवातीला त्याने मौन बाळगले. तपासासाठी त्याला बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले.

पोलिस अधिकाऱ्याने उबेद हा पसार झाला का? याबाबत स्पष्टपणे सांगण्यास नकार दिल्याने सूत्रांचा दावा खरा तर नाही ना? असा संशय निर्माण झाला आहे. उशिरारात्रीपर्यंत अधिकाऱ्यांने याबाबत अधिक बोलण्याचे टाळले.

Leave a Reply