पुणे : ५ मे – सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलंय. दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केलीय. नवाब मलिकांना राज्य सरकारकडून बळीचा बकरा केलं जात असल्याचं आंबेडकर म्हणालेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारकडून जी पत्रकार परिषद घेण्यात आली त्यात नवाब मलिक यांना का पुढे करण्यात आलं? राष्ट्रवादी काँग्रेसकडे एवढे नेते असताना नवाब मलिकच का? असा सवाल आंबेडकरांनी विचारलाय. नवाब मलिक मराठा आरक्षणावर बोलतात मग मुस्लिम आरक्षणावर का बोलले नाहीत? असंही आंबेडकरांनी विचारलंय. इतकंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे आता मराठा आरक्षणावर फुलस्टॉप लागल्याचंही आंबेडकर म्हणाले. आता गरीब मराठ्यांनी आपलं अस्तित्व दाखवलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात भाजप आणि महाविकास आघाडी सरकार कमी पडलं. राज्यातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांमध्ये बसणारे आरक्षण राज्य सरकारनं आणायला हवं, अशी भूमिकाही आंबेडकरांनी मांडली आहे. राज्यातील श्रीमंत मराठा समाज गरीब मराठा समाजाला जगू देणार नाही. भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील मराठा नेत्यांनी गरीब मराठा समाजावर अन्याय केलाय, असा आरोपही आंबेडकरांनी केलाय. आता गरीब मराठा समाजानं आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायला हवी. श्रीमंत मराठा समाजाच्या मागे जायचं की नाही, हे ठरवायला हवं, असंही ते म्हणाले.