चंद्रपूर : ४ मे – पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत नाकाबंदीदरम्यान देशी दारूसाठा जप्त केला. तर बरांज तांडा येथील गावठी दारूसाठा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. यात ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी श्रीकांत रमेश समर्थ (वय २२) राहणार नागपूर या आरोपीला अटक करण्यात आली. श्रीकांत हा एम.एच. ३१ इ.क्यू. 0५३४ या चार चाकी वाहनाने नागपूरहून देशी दारूसाठा आणत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्याआधारे एनटीपीसी परिसरात नाकाबंदी केली असता ती नाकाबंदी पाहून आरोपीने वाहन घेऊन जागेवरून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्या आरोपीला अटक केली. त्याच्या वाहनात असलेले देशी दारू किंमत २ लाख ५0 हजारांचा दारूसाठा जप्त केला व वाहन ताब्यात घेतले.
तर दुसर्या कारवाईत बराच तांडा परिसरात हातभट्टीची दारू काढत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी धाड टाकून गुळाची दारू व साहित्य असा ४२ लाखांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला. यातील आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभागप्रमुख अमोल तुळजेवार, केशव चीटगिरे ,निकेश ढेंगे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार यांनी केली.