नवी दिल्ली : २ मे – सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला लंडनमध्ये असून लवकरच भारतात परतेन असं त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे. अदर पुनावाला यांनी नुकतंच एका मुलाखतीत धमकवणारे फोन येत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सध्याच्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरवता येईल यासंदर्भात मी कोणाचं नाव घेतलं किंवा उत्तर दिलं तर माझा शिरच्छेद केला जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.
‘कंपनीचे भागिदार आणि स्टेकहोल्डर्स यांच्यासोबत ब्रिटनमध्ये बैठक पार पडली. बैठक चांगल्या पद्धतीने झाली. पुण्यात कोव्हिशिल्डचं उत्पादन जोरात सुरु आहे. मी काही दिवसात परत आल्यानंतर लस उत्पादनाची समीक्षा करेन’, असं ट्विट अदर पुनावाला यांनी केलं आहे.
अदर पुनावाला यांनी ब्रिटनमधील Mayfair येथे एक आलिशान बंगला भाड्याने घेतला आहे. या बंगल्यासाठी अदर पुनावाला एका आठवड्यासाठी तब्बल ५० लाख रुपये मोजत आहेत. अदर पुनावाला यांनी पोलंडचे अब्जाधीश उद्योगपती डोमिनिका कलजिक यांच्याकडून हा बंगला भाड्याने घेतला आहे. ब्रिटनमधील सर्वात मोठ्या घरांपैकी एक असणारं हे घर जवळपास २५ हजार फुटांच्या परिसरात आहे. ब्रिटनमधील जवळपास २४ घरं या जागेवर सामावतील इतका परिसर मोठा आहे.
अदर पूनावाला हे सध्या कुटुंबासोबत ब्रिटनमध्ये आहेत. तिथेच त्यांनी ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत या दबावाबद्दल माहिती दिली तसेच सीरम इन्स्टिट्यूट आता देशाबाहेर लस निर्मितीचा प्लॅन्ट सुरू करण्याचेही नियोजन करत असल्याचंही ते म्हणाले होते. सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या दोन लसींना भारत सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, आत्तापर्यंत देशात झालेल्या लसीकरणामध्ये सर्वाधिक लसीकरण हे अदर पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेल्या कोविशिल्ड लसीचं झालं आहे.