कोलकाता : २ मे – पश्चिम बंगालमधील बहुचर्चित नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. अटीतटीच्या लढतीत भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा अगदी थोडक्या मतांनी पराभव केला असल्याचं वृत्त आहे. तर अजून मतमोजणी सुरू असून कुणीही अफवा पसरवू नये, असं आवाहन तृणमूलने केलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या विजयाचं सस्पेन्स वाढलं आहे.
सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हापासून शुभेंदू अधिकारी नंदीग्राममध्ये आघाडीवर होते. त्यानंतर दुपारी ममता बॅनर्जी यांनी आघाडी घेतली होती. कधी ममता बॅनर्जी तर कधी अधिकारी आघाडीवर असल्याचं वृत्त येत होतं. त्यानंतर काही वेळापूर्वीच ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्याची बातमी आली. ममता बॅनर्जी यांनी 1200 मतांनी विजय मिळवला असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या कालीघाट येथील निवासस्थानसमोर ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला होता. नंदीग्राममधील मतमोजणी संपल्याचं वाटत असतानाच थोड्यावेळापूर्वी ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ममता बॅनर्जी यांचा 1622 मतांनी पराभव झाला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शुभेंदू अधिकारी विजयी झाल्याचं वृत्त आहे. या वृत्तावर ममता बॅनर्जी यांनी भाष्य केलं आहे. नंदीग्रामबाबत चिंता करू नका. मी नंदीग्रामसाठी संघर्ष केला आहे. जनता जो निर्णय देईल, तो मान्य असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. नंदीग्रामचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे कुणीही अफवा पसरवू नये, असं ट्विट तृणमूल काँग्रेसने केलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी विजयी झाल्या की पराभूत झाल्या? याबाबतचं सस्पेन्स वाढलं आहे.
दरम्यान थोड्याच वेळापूर्वी निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांचा प्रभाव झाला असून सुवेंदू अधिकारी हे विजयी झाले असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेनंतर ममता बॅनर्जी यांनी फेरमतमोजणीची मागणी केली असून जरूर पडल्यास आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावू असा इशाराही त्यांनी दिला आहे.