कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारने योग्य पाऊले उचलली नाहीत – राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली : २ मे – देशातील कोेरोना स्थिती अतिशय बिकट झाली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला जबाबदार धरले आहे. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलेली नाहीत आणि कोणी कोणताही इशारा दिला तरी त्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले, असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
कोरोनामुळे भारतात ज्या प्रकारे भयाणक स्थिती निर्माण झाली आहे. त्यानं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. देशात सर्वत्र रांगा लागलेल्या आहेत. कुठे ऑक्सिजनसाठी रांगा आहेत, तर कुठे औषधांसाठी, कुठे बेडसाठी तर अगदी स्मशानभूमीच्या बाहेरही रांगा लागल्याचे विदारक चित्र आहे. कोरोनामुळे अशी स्थिती निर्माण होईल याकडे आम्ही सरकारचे लक्ष वेदत होतो, मात्र त्याकडे सरकारने सरळ-सरळ दुर्लक्ष केले, असे राहुल गांधी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
कोरोनाला सामोरे जाण्यासाठी, त्याचा मुकाबला करण्यासाठी आमच्याकडे सर्वच साधनांचा अभाव आहे. राजधानी दिल्लीत असलेली रुग्णालयेही वेगाने भरत आहेत. देशातील डॉक्टर ऑक्सिजनची मागणी करत आहेत. ऑक्सिजनसाठी न्यायालयात याचिका दाखल केल्या जात आहेत. आमचे हेल्थकेअर कर्मचारी रुग्ण मरत असल्याचे त्यांच्या डोळ्यासमोर पाहत आहेत. ते लोकांचे प्राण वाचविण्यात असमर्थ आहेत. जगात सध्या भारत कोरोना विषाणूचा केंद्रबिंदू बनला आहे. कोरोनामुळे भारताची झालेली अवस्था पाहून संपूर्ण जग हादरले आहे, असे ते म्हणाले.
ही अशी भयावह स्थिती होऊ नये, यासाठी अनेकांनी बर्याच वेळा सूचना दिल्या होत्या. शास्त्रज्ञांनी अनेक वेळा सरकारला इशारा दिला पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आपण अधिक चांगली तयारी करायला हवी होती आणि आपण ती करू शकलो असतो. मात्र, आता अशी स्थिती निर्माण झाली असताना सरकार कुठे आहे? या सर्व गोष्टींपासून ते अलिप्त आहेत. सत्ताधारी केवळ पंतप्रधानांची प्रतिमा वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि इतरांवर दोषारोप करत आहेत. आजकाल एक नवीनच शब्द चर्चेत आहे, की ही व्यवस्था अयशस्वी झाली आहे. ही व्यवस्था कोण आहे? कोण सिस्टम चालवतं? सरकारचा हा फक्त जबाबदारीपासून दूर पळण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
आपला देश सध्या आरोग्य आणीबाणीच्या कठीण परिस्थितीतून जात आहे. मात्र, सरकारची सर्वात मोठी समस्या ही आहे की, ते अगोदर घोषणा करतात आणि नंतर त्यावरून मागे हटतात. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणा बाहेर गेली असताना आता त्यांनी चेंडू राज्यांकडे टोलवला आहे. पंतप्रधानांनी खरोखरच राज्ये आणि जनता आत्मनिर्भर बनवली आहे. स्वत: वर विश्वास ठेवा कोणीही तुम्हाला मदत करायला येणार नाही. पंतप्रधान तर अजिबात नाहीत, हे यांचे आत्मनिर्भरतेचे धोरण आहे का? सध्याच्या काळाची गरज आहे की, की आपण सर्वजण एकत्र येऊन या साथीला सामोरे गेले पाहिजे. राहुल यांनी असाही आरोप केला की, भारत हा जगातील एकमेव असा देश आहे, जो तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय या कोरोना महामारीचा सामना करीत आहे.

Leave a Reply