नवी दिल्ली : १ मे – देशभरात कोरोनाचं प्रचंड संकट निर्माण झाल्याने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे. कोरोना महामारीच्या संकटात तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते. ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावला त्या लाखो कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करते. देशावासियांसाठी हा संकटाचा काळ आहे. आपण एकमेकांचा हात पकडून पुढे गेलं पाहिजे, असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे. तसेच कोरोनाचं संकट वाढलं असून आता केंद्र आणि राज्य सरकारांनी जागं व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
सोनिया गांधी यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे हे आवाहन केलं आहे. सध्याची परिस्थिती मानवतेला हादरवणारी आहे, हे मला माहीत आहे. काही ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे. तर काही ठिकाणी आयसीयू बेड्सची टंचाई आहे. ही परीक्षेची वेळ आहे. एकमेकांना मदत करा. आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा. घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी सावध राहण्याची गरज आहे, असं सांगतानाच कमी वेळात सर्वांना व्हॅक्सिन मिळावी म्हणून सर्व राज्यांमध्ये व्हॅक्सिनशी संबंधित लायसन्स द्यायला हवेत, असं सोनिया गांधी म्हणाल्या.
यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांना जागे होण्याचं आवाहनही केलं. केंद्र आणि राज्य सरकारांनी आता जागे व्हावे. आपलं कर्तव्य पार पाडावे, असं आवाहन करतानाच सरकारने सर्वात आधी गरिबांचा विचार करावा. तसेच लोकांचं स्थलांतर थांबवावं. गरीबांच्या खात्यामध्ये किमान 6 हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी त्यांनी केली. कोरोना चाचण्या वाढवा, ऑक्सिजन, औषधांचा साठा युद्ध पातळीवर पुरवा, मोफत लसीकरणाची व्यवस्था करा, कोरोना लसीच्या किंमतींमधील तफावत दूर करा, अशी मागणीही त्यांनी केली.
एकजूट राहणे हाच सध्याच्या परिस्थितीत सर्वात मोठा मंत्र आहे. आपल्या देशाने यापूर्वी अनेक मोठ मोठ्या संकटाचा सामना केला आहे. त्यामुळे कोरोनाचं संकटाचं गांभीर्य ओळखून एक नागरिक म्हणून प्रत्येकांना संपूर्ण योगदान द्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.