पालघर : १ मे – महाराष्ट्र हा सध्या देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र बनला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा पुरवत आहे. मात्र, या मदतीचे योग्यप्रकारे वाटप होत नाही. ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा जास्तीत जास्त साठा पॉवरफूल मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्येच जात आहे. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांतील लोकांवर अन्याय होत असल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ते आज पालघर जिल्ह्यातील कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. पालघरसारख्या जिल्ह्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. एखाद्या जिल्ह्यात किती रुग्ण, बेडस् आणि आरोग्य सुविधा आहेत, याचा विचार केला जात नाही. ताकदवान नेते केंद्राकडून आलेली मदत आपापल्या जिल्ह्यांमध्ये नेत आहेत. मंत्री हे सर्व राज्याचे असतात. त्यामुळे त्यांनी सगळं आमच्याच जिल्ह्यात आलं पाहिजे, अशी मानसिकता ठेऊ नये, असे खडेबोल फडणवीसांनी महाविकासआघाडीला सुनावले.
महाराष्ट्र हा सध्या देशातील कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र झाला आहे. राज्यात कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. पहिल्या लाटेत कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला बाधा होत असे. मात्र, आता संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब कोविडबाधित होताना दिसत आहे. तसेच यावेळच्या लाटेत सर्व वयोगट आणि समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.
इतक्या मोठ्याप्रमाणावर रुग्ण वाढत असल्याने आरोग्यव्यवस्था परिस्थिती हाताळण्यात कमी पडत आहे. मात्र, या लाटेत 70 ते 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यांच्यावर फार मोजके उपचार करुन त्यांना बरे केले जाऊ शकते. मात्र, कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वजण लगेच रुग्णालयांमध्ये धाव घेत आहेत. परिणामी आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील भीती दूर केली पाहिजे. जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवरील ताणही कमी होईल, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.