मुंबई : १ मे – महाराष्ट्र राज्य सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. राज्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येते आहेत. महाराष्ट्रात सरकारनं कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी विशेष सहायता निधी निर्माण केला. भारतरत्न लता मंगेशकर यांनी कोविड १९ साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्र राज्य कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना समर्थपणे करतोय. कोविड १९ विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड १९ मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयानं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री सहायता निधीसाठी https://cmrf.maharashtra.gov.in/index ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्कम जमा करण्याबाबत माहिती उपलब्ध होईल.