नवी दिल्ली : १ मे – भारतातील कोरोना स्थिती भयानक असून संपूर्ण लॉकडाऊन गरजेचा आहे, असा सल्ला साथरोग विशेषज्ञ आणि अमेरिकेतील बायडन प्रशासनातील वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार अँथनी फाऊची यांनी दिला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतात त्वरित काही आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्यात यावा, असं फाऊचींनी सुचवलं.
कोरोना साथरोगाविषयी भाष्य करणारे अँथनी फाऊची हे अत्यंत विश्वासार्ह वैद्यकीय सल्लागार मानले जातात. देशाला सहा महिने लॉकडाऊन करण्याची गरज नाही. काही आठवड्यांच्या शट डाऊननेही संसर्गाची साखळी तोडता येऊ शकते. गेल्या वर्षी कोरोनाचा विस्फोट होताना चीनने आखलेल्या उपाययोजना हे उत्तम उदाहरण असल्याचं फौसी यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
अँथनी फाऊची यांनी सुचवलेल्या उपाययोजना
1) भारतात जास्तीत जास्त लसीकरण करा, त्यामुळे ऑक्सिजनची गरज असलेल्या, हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असलेल्या व्यक्तींना फायदा होणार नाही. त्यामुळे जनतेची काळजी घ्या.
2) ऑक्सिजन पुरवठ्यासाठी प्लॅन बनवण्याची गरज आहे. ऑक्सिजन आणि आरोग्य सुविधासाठी WHO आणि अन्य देशांची मदत घ्यावी. भारताने कठीण काळात इतर देशांची मदत केली, आता इतर देशांनी परतफेड करण्याची वेळ आली आहे.
3) चीनमध्ये ज्याप्रमाणे कोरोनाची परिस्थती बिकट झाली होती, त्यावेळी त्यांनी काही दिवसातच हॉस्पिटल उभारले. त्याच्यात लागणारे युनिट तयार केले. तेच भारताने करावे. भारताची सध्याची परिस्थती युद्धासारखी आहे. ज्याप्रमाणे युद्ध काळात युद्धभूमीवर हॉस्पिटल तयार करुन घेतात, त्याच धर्तीवर सैनिकांकडून हॉस्पिटल तयार करुन घ्यावं. जगातील जेवढ्या लसी आहेत, त्यांच्याकडून आयात करुन लवकरात लवकर लसीकरण करावे
4) दोन आठवड्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात यावं. भारतासारख्या देशात फक्त 2 टक्के लस देण्यात आली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. त्यामुळे स्वतःच्या क्षमता वापरायला हव्यात
5) भारताने कोरोना गांभीर्याने घेतले पाहिजे होते. अमेरिकेसारख्या देशाने पूर्ण तयारी करुनही कोरोनाने हाहाकार माजवला होता. भारताने कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिंएंटवर लस तपासून घ्यायला पाहिजे होती, पण आधीच ती प्रभावशाली असल्याची घोषणा करण्यात आली.
6) भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे त्यांनी जगातील सर्व लस कंपनींसोबत बोलून आयात करायला पाहिजे होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होईल. देशातील उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज आहे
7) ऑक्सिजन पुरवठा वाढवणे, औषधं मिळवणे, पीपीई किट घेणे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे संपूर्ण लॉकडाऊन लागू करणं
8) अमेरिकेची स्थिती काही काळापूर्वी भारतासारखी होती पण आम्ही लसीकरण मोठ्या प्रमाणावर केले. अमेरिकेने 100 मिलियन म्हणजे दहा कोटी जनतेचे संपूर्ण लसीकरण केले आहे. जवळपास 40 टक्के जनता संपूर्ण लसीकरण झालेली आहे, तर 50 टक्क्यांपेक्षा अधिक अमेरिकन्सना किमान एक डोस मिळालेला आहे.
9) लॉकडाऊन करुन मोठ्या प्रमाणावर लसीकरण करुन स्थिती सुधारु शकते. लॉकडाऊन कोणालाच नको असतो, सहा महिन्यांचा लॉकडाऊन लागू केला, तर तो जाचक ठरेल. मात्र काही आठवड्यांच्या शट डाऊनने स्थिती सुधारेल
10) भारतातील नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. बाहेरील देश मदत करायला तयारच आहेत. एकमेकांची काळजी घ्या, आपण लवकरच यातून बाहेर पडणार आहोत.