कोरोना काळातही राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावला जाईल – राज्यपालांचा आशावाद

मुंबई : १ मे – महाराष्ट्राच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राला उद्देशून विशेष संदेश दिला. तसेच, सध्याच्या संकट काळामध्ये राज्यातील जनतेनं करोनासंदर्भातले नियम पाळून सुरक्षित व्हावे. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी करोना काळात राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजना आणि करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्य विविध उपाययोजना यांच्याविषयी देखील माहिती दिली. “कोविड-१९च्या संकटावर मात करताना राज्याची अर्थव्यवस्था सांभाळत वंचित, उपेक्षित, शेतकरी, महिलांना न्याय देताना राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावला जाईल यासाठी माझे शासन काम करत आहे”, असं राज्यपाल यावेळी म्हणाले.
“गेल्या सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण करोनाविरोधात एकजुटीने लढत आहोत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून करोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. माझ्या शासनाने साथीला आळा घालण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. यासोबतच लसीकरणाचा वेगही वाढवला आहे. २२ एप्रिलपर्यंत सुमारे १ कोटी ३७ लाख लोकांचे लसीकरण करून महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. राज्याच्या विनंतीवरून केंद्र सरकारमार्फत हाफकिन संस्थेला लस उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे. राज्यात उत्पादित होणारा ऑक्सिजन १०० टक्के वैद्यकीय वापरासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त ऑक्सिजनसाठी राज्य सरकारच्या पुढाकाराने रेल्वेची विशेष ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना करण्यात आली. देशातला हा पहिला प्रयोग ठरला आहे. शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. शिवभोजन थाळीचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातल्या ७ कोटी लाभार्थ्यांना एक महिना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे”, असं राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात सांगितलं आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना त्यांनी सरकारचं कौतुक देखील केलं आहे. “महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यासाठी माझ्या शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात राज्याची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे”, असं ते म्हणाले.

Leave a Reply