अमरावती : २९ एप्रिल – वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व मेळघाट टायगर प्रोजेक्टचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अटक करण्यात आली. त्यांना नागपूर येथून ताब्यात घेऊन धारणीत आणण्यात आले आहे.
दिपलीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी तत्कालीन उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या इतकेच श्रीनिवास रेड्डी सुद्धा जबाबदार असल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी दिपलीच्या कुटुंबीयांनी, विविध राजकीय पक्ष व संघटनांनी लावून धरली होती. भाजपाने तर तीव्र आंदोलन केली होती. या संतप्त भावनांची दखल घेऊन शासनाने सदर प्रकरणात रेड्डी यांची प्रशासकीय कृती दिपालीच्या आत्महत्येस कारणीभूत आहे की नाही, याची चौकशी करण्यासाठी अपर पोलिस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. सरवदे यांनी सलग दोन दिवस आणि त्या तत्पूर्वी त्यांनी पाठविलेल्या पथकाने सखोल चौकशी केली. त्यांनी आपला अहवाल सादर केल्यानंतर धारणी पोलिस ठाण्यात रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई होत असतानाच रेड्डी यांना नागपूर येथून पोलिस पथकाने ताब्यात घेतले व धारणीत आणले. सदर प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक पूनम पाटील यांच्या नेतृत्वात सुरू आहे.