नवी दिल्ली : २९ एप्रिल – नवी दिल्लीत ऑक्सिजनचं प्रचंड संकट निर्माण झालं आहे. लोक ऑक्सिजनसाठी भटकत आहेत. त्याची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. काहीही करा आणि ऑक्सिजनचं संकट दूर करा, लोक मरत आहेत, असे निर्देशच दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.
टँकर्स ऑक्सिजन पुरवठ्याची मोठी ताकद आहे, असं सांगतानाच तुम्हाला काही तरी करावं लागेल. रोज लोक मरत आहेत. जवळच्या नातेवाईकांनाही बेड्स मिळत नाहीत, असं कोर्टाने केंद्राला सांगितलं. राजधानी दिल्लीत इतर राज्यातून कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी येत असल्याचं कोर्टाने मान्य केलं. मात्र, कोणत्याही रुग्णाला उपचारापासून दूर ठेवता येणार नाही. कोर्ट जे काही सांगत आहे, त्यामुळे लोक पॅनिक होत नाहीयेत. तर जी वस्तुस्थिती आहे, त्यामुळे लोक पॅनिक होत असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.
रुग्णालयात बेड रिकामे आहेत. कारण तिथे ऑक्सिजन नाहीये. त्यामुळे ही समस्या तुम्हाला सोडवावी लागणार आहे. ही समस्या कशी सोडवणार ही तुमची जबाबदारी आहे, असं सांगतानाच तुम्ही महाराष्ट्राला किती ऑक्सिजन दिलं, असा सवालही कोर्टाने केंद्राला केला. त्यावर संपूर्ण देशातील ऑक्सिजन पुरवठ्यावर फोकस करू नये ही आमची विनंती आहे, असं केंद्राने सांगितलं.