अहमदाबाद : २८ एप्रिल – नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या दिल्ली विरुद्ध बंगळुरु या सामन्यात बंगळुरुने दिल्लीवर एका धावेने निसटता विजय मिळवला. दिल्लीनेही बंगळुरुला तोडीत तोड उत्तर दिलं. दिल्लीच्या हातातोंडाशी आलेला घास मोहम्मद सिराजने हिरावून नेला. परंतु बंगळुरुच्या विजयाचा पाया ए बी डिव्हिलिर्सने रचला. त्याने दिल्लीविरोधात केवळ ४२ चेंडूत ७५ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या खेळीमुळेच बंगळुरुला 171 धावा करता आल्या आणि मॅचही जिंकता आली. मॅचनंतर कर्णधार विराट कोहलीने ए बी डिव्हिलिर्सच्या खेळीचं तोंडभरुन कौतुक केलं. “असं वाटतंच नाही की डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्याची आजची खेळी पुन्हा-पुन्हा पाहण्यासारखी आहे”, अशा शब्दात त्याने डिव्हिलियर्सवर स्तुतीसुमने उधळली.
“डिव्हिलियर्सला मी हे सांगितलेलं आवडणार नाही. पण मागील पाच महिन्यापासून त्याने कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट सामने खेळलेले नाहीत. असं वाटतंच नाही की डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्याची आजची खेळी पुन्हा-पुन्हा पाहण्यासारखी आहे, त्याच्या खेळीला माझा सलाम… अशीच बॅटिंग त्याने करत राहो”, अशा शब्दात त्याने डिव्हिलियर्सची स्तुती केली.
“डिव्हिलियर्स ही आमच्यासाठी मालमत्ता आहे. मी पुन्हा सांगतो की (चेहऱ्यावर हास्य आणत) मागील पाच महिन्यापासून त्याने कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट सामने खेळलेले नाहीत. पण असं असतानाही त्याने खेळलेली खेळी सुंदर आणि बहारदार आहे”, असं विराट म्हणाला.
रॉयल्स चॅलेजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या उभय संघात रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात ए बी डिव्हिलियर्सने दिल्लीच्या बोलर्सची पिटाई केली. त्याने केवळ 42 चेंडूत 75 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि उत्तुंग 5 षटकार लगावले. डिव्हिलियर्सच्या खेळीमुळे बंगळुरुला 172 धावा करता आल्या.