अकोला : २८ एप्रिल – राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक यांना लिहिलेल्या चौदा पानी पत्रात परमबीर सिंग यांच्या विरोधात अकोला येथे कार्यरत नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक बी.आर.घाडगे यांनी गंभीर आरोप केले आहेत. अकोल्यातील नियंत्रण कक्षात कार्यरत पोलिस निरीक्षक बी.आर.घाडगे यांनी ठाणे शहर पोलिस आयुक्त असताना परमबीर सिंग यांच्या १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीतील विविध गैरप्रकारांचा पाढा पाठविलेल्या पत्रात वाचला आहे. तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मनमानी करुन भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, हे पत्र समाज माध्यमांवर वेगाने प्रसारित झाले आहे. या पत्रात परमबीर सिंग यांच्यावर विविध प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहे.
त्याच बरोबर अधिकार नसताना ते दोन शासकीय निवासस्थान व नियमबाह्यपणे अतिरिक्त पोलिस वैयक्तिक कामासाठी वापरत असल्याचा आरोप या पोलिस निरीक्षकाने मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेल्या पत्रात केला आहे. परमबीर सिंग यांच्या बेनामी संपत्ती, त्यांच्यासाठी काम करणार्या पोलिस कर्मचारी व एजंटचा उल्लेख या पत्रात असून याची चौकशी झाल्यास राज्यात नवे प्रकरण समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बदल्या, दिवाळी भेट, गुन्ह्यातील आरोपींना नियमबाह्यपणे मदत करणे असे विविध आरोप या चौदा पानी पत्रात पोलिस निरीक्षक घाडगे यांनी केले आहे. दरम्यान,या पत्राने राज्यातील पोलिस दलात चांगलीच खळबळ माजली आहे. तर याची चौकशी झाल्यास राज्यात नवे प्रकरण समोर येईल अशी माहिती प्राप्त झाली आहे.