जीव धोक्यात घालून पकडली ४ लाखांची अवैध दारू, वरिष्ठांनी वाहिली शिव्यांची लाखोली

चंद्रपूर : २७ एप्रिल – गुप्त सूचनेच्या आधारावर प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणार्‍या पोलिस प्रवीण रामटेके यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून शनिवारी पहाटे विदेशी दारूची अवैध वाहतूक करणार्‍या पिकअपमधून २२ लाखांची दारू पकडून दिली व स्वत: फिर्यादी बनून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याने वरिष्ठांनी त्यांना शाब्बासकी देण्याऐवजी शिव्यांची लाखोली वाहिल्याने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पहाटे तीन वाजताच्या सुमारास त्यांना एका मुखबिराने वरोरा शहरातून चंद्रपूरकडे मोठय़ा प्रमाणात दारू वाहतूक होणार असल्याचे कळविल्याने ते दोन पंचांना घेऊन नागपूर-चंद्रपूर हायवेवरील आनंदवन चौकात पोहोचले. सूचनेप्रमाणे विना नंबर प्लेटवाली पिकअप भरधाव वेगाने येताना दिसताच त्यांनी संबंधित वाहनचालकाला थांबण्याचा इशारा केला. पण, त्याने न थांबता आणखी सुसाट वेगाने पळ काढला. पोलिस शिपाई रामटेके यांनी आपल्या चारचाकी वाहनाने त्याचा पाठलाग करताच अशोक लेलँड कंपनीची पिकअप चालविणार्‍या त्या वाहनचालकाने बोर्डा परिसरात गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. त्यांनी त्या गाडीची तपासणी केली असता ताडपत्री टाकून विदेशी दारू ठसाठस भरल्याचे निदर्शनात आले.
विशेष म्हणजे सदर पिकअपला त्याच्या मालकाकडे सुस्थितीत पोहोचविण्यासाठी चंद्रपूर पोलिस विभागाच्या भ्रष्ट कर्मचार्‍यांकडून पायलेटिंग करण्यात येत होते. अवैध दारू वाहतूक करणारे पिकअप पकडताच चंद्रपूर गुन्हे शाखेच्या एक दोन पोलिसांनी तसेच बंडू नावाच्या नामचीन दारू तस्कराने सदर गाडी सोडण्यासाठी पोलिस रामटेके यांच्याशी संपर्क साधला व सुरुवातीला विनंती, नंतर दम दिला. शेवटी रामटेके यांना वरोरा पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकार्‍यामार्फत सदर गाडी कोणतीही कारवाई न करता सोडून देण्याचे आदेश देण्यात आल्याचे कळते. परंतु रामटेके यांनी तस्करांच्या व भ्रष्ट वरिष्ठ अधिकार्‍यांच्या चुकीच्या आदेशाला भीक न घालता अत्यंत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावीत स्वत: फिर्यादी म्हणून तक्रार नोंदवित सदर पिकअप पोलिस स्टेशनला जमा केली.
गाडी पोलिस स्टेशनला लागल्यानंतर पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून पोलिस रामटेके याच्यावर शिव्यांचा भडिमार करण्यात आला. अवैध दारूची एवढी मोठी कारवाई एकट्याने एक हाती पार पाडूनसुद्धा त्यांच्या मदतीला अपवाद वगळता कोणीच पोलिस कर्मचारी नव्हते. शेवटी रामटेके व त्यांच्या दोन पंचांनीच गाडीतून दारूचे खोके खाली उतरून मोजणी केली व नंतर तसेच गाडीत भरले. पिकअप गाडीत स्टलिर्ंग रिझर्व्ह बीएफ कंपनी, बॅच नंबर- २६0 दि. २७/३ /२१ एकूण किंमत १ लाख ३६ हजार ४00 तसेच गो- गो प्रीमियम कंपनी बॅच नंबर- ४0 दि. 0३ / २१ एकूण किंमत ५ लाख ८३ हजार २00, रियल स्टार प्रिमियम कंपनी बॅच नंबर- १६, दि. 0३ / २0 एकूण किंमत २ लाख३0 हजार ४00, रियल प्रिमियम कंपनी बॅच नंबर- ३७ दि.0३/२१ एकूण किंमत ८ लाख ९२ हजार ८00 असा एकूण १८ लाख ४३ हजार २00 रु.चा मालाचा समावेश होता.
विदेशी दारू करीता वापरलेली अशोक लेलन्ड कंपनीची पिकअप गाडी किंमत ४ लाख रुपये ताब्यात घेतली. एकूण विदेशी दारू व पिकअप मिळून २२ लाख ४३ हजार २00 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. व अज्ञात आरोपी विरूद्ध अपराध क्र.३३७/२0२१ कलम ६५ (अ ) ८३ म.दा.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जे काम पोलिस विभागाचे होते ते काम एकट्या पोलिस शिपायाने स्वबळावर केले असताना त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन जाहीररीत्या त्याचा गौरव करण्याऐवजी शिव्या व अपमानास्पद वागणूक मिळाल्याने पोलिस विभागात नेमके चालले आहे तरी काय? असा प्रश्न चर्चिला जात आहे.

Leave a Reply