शस्त्राचा धाक दाखवून ३ लाखाचा मुद्देमाल पळवला

नागपूर : २६ एप्रिल – परिचितासोबत दुचाकीने जात असलेल्या इसमाला शस्त्राचा धाक दाखवून तीन आरोपींनी जबर मारहाण केली. तसेच इसमाच्या अंगावर असलेले सोने आणि हिर्‍याचे दागिने चोरून पळ काढल्याची घटना हुडकेश्‍वर हद्दीत समोर आली. याप्रकरणी हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी संजय जगदीशप्रसाद तिवारी (५0) रा. अयोध्यानगर यांचा परिचित अक्षय रवी नवसारे (२५) रा. अमरनगर याने संजय यांना फोन करून २00 रु. मागितले. पैसे देण्यासाठी संजय हे त्यांची अँक्टिवा गाडी क्र.एम.एच. /४९/ बी.जी./७४८८ ने म्हाळगीनगर चौक येथील पेट्रोल पंपजवळ गेले. तेव्हा अक्षय त्यांना म्हणाला की, पैसे जवळ ठेवा आणि माझ्यासोबत चला. संजय त्यांच्या चांगला परिचयाचा असल्याने त्यांनी गाडी सुरू केली. अक्षयने संजयला मागे बसविले आणि स्वत: गाडी चालवित हुडकेश्‍वर रोडने सरळ जबलपूर हैदराबाद हायवे आऊटर रिंगरोडने गाडी वेगाने चालवू लागला. दरम्यान, संजय हे लघुशंकेसाठी हायवेवरील हिवरकर लेआऊटमधील प्लॉट क्र. 0८/३0 -७0 येथे थांबले असता, समोरील मोकळ्या जागेतून २0 ते ३0 वयोगटातील ३ आरोपी संजय यांच्या दिशेने धावत आले. त्यावेळी तीन आरोपी इसमांपैकी एकाने अक्षयला दगड फेकून मारला.
आरोपी त्याच्या दिशेने धावत येत असल्याचे पाहून तो पळून गेला. आरोपींनी संजय यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकली. तर दुसर्‍याने संजय यांना हातबुक्कीने मारहाण करीत शेतात ओढून नेले. तेथेही तिघांनीही संजय यांना मारहाण करून शस्त्राने जखमी केले आणि संजय यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, सोन्याची गठाई केलेली रूद्राक्षाची माळ, हातातील सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याची अंगठी, हिर्‍याची अंगठी आणि अक्षय याचा मोबाईल असा एकूण ३,२६,५00 रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळून गेले. याप्रकरणी हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply