कारागृहात तीन कैद्यांनी केला एकावर जीवघेणा हल्ला

नागपूर : २६ एप्रिल – मकोकाअंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारावर रविवारी सकाळी मध्यवर्ती कारागृहात जीवघेणा हल्ला करण्यात आला. पण, कारागृह कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे गंभीर घटना टळली. हल्ला करणारे चारही आरोपी खुनाच्या गुन्ह्य़ात शिक्षा भोगत आहेत. तर जखमी देखील कुख्यात अपराधी आहे. कारागृहात वर्चस्वाच्या लढाईतून हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. रोशन कय्यूम शेख असे जखमी कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, रोशन शेख हा कुख्यात गुंड आहे. महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळणे, खंडणी, वसूली, जीवे मारण्याची धमकी देणे तसेच अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता गौरव दाणीला खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात त्याच्यावर अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात तो १0 जून २0२0 पासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. कारागृहातही त्याने रंगदारी करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता. कारागृहातही तो इतर कैद्यांसोबत उर्मटपणेच वागत होता. त्यामुळे त्याचे इतर कैद्यांशी पटत नव्हते. खंडणी मागून त्याने मोठी मालमत्ता जमविली होती. त्यामुळे त्याचे वागणेही गुंडगिरीचेच होते. रविवारी (ता.२५) सकाळी ९ वाजताच्या सुमारास हत्याकांडातील कैदी जतीन ऊर्फ जय योगेश जंगम (१८), बंटी ऊर्फ जेरॉम जॉर्ज निकोलस (२३), अरनॉल्ड ऊर्फ शेल्टीन क्रिस्टोफर (१९) आणि विशाल नारायण मोहर्ले (१९) हे यार्डच्या बाहेर असलेल्या हौदावर आंघोळ करीत होते. रोशन तिथे आंघोळ करण्याकरिता आला. दरम्यान, त्याने पाण्याची बादली घेण्यावरून आणि पहिला नंबर लावण्यावरून वाद घातला. त्यामुळे जतिन जंगम आणि जेरॉम याने त्याच्यावर धाव घेतली. ते त्याला मारत असताना त्यांचे साथीदार विशाल मोहरले आणि अरनॉल्ड यांनीही रोशनला मारहाण करणे सुरू केले. त्यांच्याजवळ सुरीसारखे शस्त्र होते.
त्या शस्त्राने वार करून रोशनचा मुडदा पाडायच्या बेतात ते असताना गोंधळ एकूण कारागृहातील रक्षक धावून आले. त्यांनी रोशनची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. शस्त्राचे घाव बसल्यान रोशनला उपचाराकरिता मेडिकलला नेण्यात आले. तेथे उपचार करून रोशनला परत कारागृहात आणण्यात आले. याप्रकरणी सर्व आरोपींवर धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply