नागपूर : २५ एप्रिल – स्टील आणि सिमेंटचे भाव आता बांधकामासाठी न परवडणारे असून या मालाच्या उत्पादकांच्या वागणुकीबद्दल चिंता व्यक्त करीत केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते बांधकामात स्टील आणि सिमेंटचा वापर कमी करण्यावर भर दिला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून स्टील आणि सिमेंटसाठी पर्याय शोधण्याचे काम आम्ही करीत असून त्यासाठी एका समितीचे गठनही करण्यात आल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले.
‘असोचेमच्या वेबिनार’मध्ये ‘एचएएम आणि बीओटी प्रकल्प संधी व आव्हाने’, या विषयावर ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले- दररोज 37 किमी महामार्ग बांधकामाची गती, एका दिवसात चौपदरी 2.5 किमी सिमेंट काँक‘ीट रस्त्याचे बांधकाम आणि एका दिवसात 26 किमी डांबरी रस्त्याचे बांधकाम हे तीन जागतिक विक‘म आमच्या मंत्रालयाने केले आहेत. हे जागतिक विक‘म भारतीय कंत्राटदारांची क्षमता काय आहे, हे दाखविणारे आहेत. देशासाठी हे भूषणावह आहे. असे असले तरी बीओटी प्रकल्पांना शासनाच्या अपेक्षेप्रमाणे फारसा प्रतिसाद मिळत नाही. तसेच बँकेचे आर्थिक वर्ष समाप्ती आणि बँक गॅरंटी याबद्दलच्या अडचणी कंत्राटदारांना भेडसावत आहेत. यावरही अर्थ मंत्रालयाशी चर्चा करून मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.
महामार्ग मंत्रालयाचे काम अत्यंत उत्तम सुरु असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- मंत्रालयाने 13,327 किमी महामार्गाचे निर्माण वर्षभरात केले असून 2020 च्या तुलनेत हे अधिक आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत महामार्गाच्या कामांना मंजुरी देण्याचे प्रमाणही अधिक आहे. मार्च 21 पर्यंत 10965 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सिमेंट व स्टीलऐवजी अन्य धातूचा किंवा स्क‘ॅप वितळवून त्याचा महामार्गाच्या बांधकामात उपयोग करता येऊ शकतो काय, हे तपासण्याचे निर्देश आपण दिले आहेत. स्टीलशिवाय वापरण्यात येणारे हे साहित्य एनएबीएल प्रमाणित प्रयोगशाळेकडून तपासून घेतले जाणार आहे आणि बांधकामाच्या दर्जात कोणताही समझोता न करता याचा वापर केल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले.
पुलांचे बांधकाम करताना ‘एक्सपान्शन जॉईंट’चे काम योग्य पध्दतीने केले जात नसल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- महामार्गाचे बांधकामही ठरलेल्या निकषानुसार केल्या जात नाही. भारतमाला परियोजनेचा दुसरा टप्पा आपण सादर केला असून 35 ते 40 हजार किमीचे बांधकाम या योजनेअंतर्गत होणार आहे. कंत्राटदार वृक्षारोपण करीत नाही अशा अनेक तक‘ारी आहेत. 20 फुटाचे झाड लावण्याच्या आपल्या सूचना आहेत. तसेच हरित महामार्ग निर्माण करायचे असल्यामुळे कंत्राटदारांनी वृक्षारोपणाची सूचना गांभीर्याने लक्षात घ्यावी. तसेच कंत्राटदारांनी बांधकामासाठी वापरण्यात येणार्या वाहनांमध्ये डिझेलचा वापर न करता सीएनजी, एलएनजीचा वापर करावा. यामुळे खर्चात बचत होईल. हरित इंधनासाठीही पुढाकार घ्यावा असेही ना. गडकरी म्हणाले.