नागपूर : २५ एप्रिल – करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस घसरत चालली आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूद याने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान नुकतंच त्यानं एका तरुणीचा जीव वाचवण्यासाठी चक्क एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीनं तिला हैद्राबाद इथं नेलं. या मदतीसाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नागपुरमध्ये राहणाऱ्या या 25 वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुळं तिच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झालं होतं. परिणामी तिला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. त्यामुळं तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी लंग्स ट्रांसप्लांट हाच एकमेवर पर्याय असल्याचं सांगितलं. परंतु नागपुरमधील लहानशा रुग्णालयात तिच्यावर ही शस्त्रक्रिया होणं शक्य नव्हता. मात्र या परिस्थितीत सोनू सूद धावून आला. त्यानं या तरुणीला चक्क एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीनं हैद्राबादच्या नेलं. अन् तेथील रुग्णालयात भरती केलं. त्याच्या या मदतीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. तरुणीचे प्राण वाचवल्यामुळं देशभरातील लोक सध्या त्याची तुलना चक्क इश्वराशी करत आहेत.