चंद्रपूर : २२ एप्रिल – चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील अनेक कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, या बधितांसाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहे. त्यामुळे अनेकांना औषधोपचार व आरोग्य सेवेला मुकावे लागते. जिल्ह्यातील ही दयनीय स्थिती सुधारण्यासाठी जिल्ह्यातील सर्व भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व कार्यकर्त्यांनी बधितास व त्यांच्या परिवारास सहकार्य करण्याचे आवाहन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.
जिल्ह्यात व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे विस्तृत जाळे विणले असल्याने महानगरातील प्रत्येक प्रभाग व ग्रामीण भागातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी या काळात संपर्पण वृत्तीने समोर येत नागरिकांमधील भीतीचे वातावरण संपुष्टात आणावे, असेही यावेळी अहीर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. आरोग्य सेवेत तथा औषोधोपचारात तसेच बधिताला रुग्णालयात दाखल करण्यात कुठलीही अडचण येत असल्यास महापौर, न. प. अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रा. पं. सदस्य, भाजप जिल्हा महानगर कार्यकारिणी सदस्य, नगरसेवक, महानगर मंडळ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख यांनी मदत करावी. अडचण झाल्यास त्वरित जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी अहीर यांनी केले.