सिरम इन्स्टिट्यूटने जाहीर केले कोव्हिशील्ड चे नवे दर

पुणे : २१ एप्रिल – सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने भारत सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी देत असल्याची घोषणा सोमवारी केली. या निर्णयाचं आपण स्वागत करत असल्याचं ‘कोव्हिशिल्ड’ची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नव्या धोरणामुळे लसीकरणाची क्षमता वाढवता येईल तसेच राज्य सरकार, खासगी रुग्णालये आणि लसीकरण केंद्राना थेट लस देता येईल यासंदर्भात सीरमने समाधान व्यक्त केलं आहे. त्याचसोबत सीरमने खुल्या बाजारात लसीची किंमत किती असेल याचीही माहिती दिली आहे. अदर पुनावाला यांनी प्रसारमाध्यमांना लसीच्या किंमतीसंदर्भात माहिती दिलीय.
पुढील दोन महिन्यांमध्ये आम्ही लस निर्मिती क्षमता वाढवणार असल्याचं सीरमने स्पष्ट केलं आहे. या पुढे आम्ही उत्पादन घेत असणाऱ्या एकूण लसींपैकी ५० टक्के लसी या भारत सरकारसाठी राखीव असतील. या लसी भारत सरकारच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत वितरित करण्यात येतील. उर्वरित ५० टक्के लसी राज्य सरकारांना आणि खासगी रुग्णालयांना विकल्या जातील असं सीरमने म्हटलं आहे.
भारत सरकारच्या आदेशानुसार आम्ही लसींची किंमत निश्चित केली आहे. त्यानुसार राज्य सरकारांना प्रत्येक लस ही ४०० रुपयांना दिली जाईल तर खासगी रुग्णालयांसाठी प्रत्येक लस ६०० रुपयांना विकली जाईल असं सीरमने म्हटलं आहे. जागतिक स्तरावरील लसींचा दर पाहता इतर लसींच्या तुलनेत स्वस्तात लस देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं सीरमने या पत्रात स्पष्ट केलं आहे. सीरमने केलेल्या दाव्यानुसार अमेरिकन लसीची भारतीय चलनानुसार प्रत्येक डोससाठी १५०० च्या आसपास आहे. रशियन लस ही ७५० रुपयांच्या तर चिनी लसही ७५० च्या आसपास उपलब्ध आहे.
सध्या लस निर्मिती आणि एकंदरित यंत्रणेवरील ताण पाहता सर्व खासगी कंपन्यांना सीरमने राज्यांच्या माध्यमातून किंवा खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून लस घेण्याचं आवाहन केलं आहे. चार ते पाच महिन्यांनंतर लस खुल्या बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली जाईल असंही सीरमने म्हटलं आहे.

Leave a Reply