गोदामांच्या तुटवड्यामुळे ४ कोटी रुपयांचे धान उघड्यावर पडून

गडचिरोली : २१ एप्रिल – गडचिरोली जिल्ह्यात धान उत्पादन व खरेदीच्या तुलनेत गोदामांची संख्या कमी असल्याने पुरेशी व सुरक्षित साठवणूक व्यवस्था नसल्याने कोट्यवधी रुपयांचे धान्य उघड्यावरच पडून सडत असल्याचा धक्कादायक प्रकार चामोर्शी तालुक्यातील अड्याळ येथील धान खरेदी केंद्रात समोर आला आहे.
अड्याळ धान खरेदी केंद्रावर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे प्रादेशिक कार्यालय गडचिरोली व उपप्रादेशिक कार्यालय घोट अंतर्गत धान खरेदी केल्या जाते. मार्च २०१९-२० मध्ये किमान आठ ते दहा कोटी रुपयांचे ४१,२९६.४० क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. मात्र अजूनही चार कोटी रुपयांचे २०,००० क्विंटल धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर पडून आहेत.
धान खराब होत असूनही आदिवासी विकास महामंडळ व शासनाचे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यापूर्वी धानाची उचल करून मानवाच्या आरोग्यास हानी होणार नाही, त्याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने दरवर्षी संस्थामार्फत धानाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, भरडाईची प्रक्रिया विलंबाने हाती घेण्यात येत असल्याने केंद्रावरून धानाची उचल करण्यास दिरंगाई होते. गडचिरोली जिल्ह्यात धान उत्पादन व खरेदीच्या तुलनेत गोदामांची संख्या कमी आहे. पुरेशी व सुरक्षित साठवणूक व्यवस्था नसल्याने खरेदी केलेल्या धानाचे दरवर्षी नुकसान होते. गेल्या दहा ते पंधरा वर्षात उघड्यावरील धान खराब होऊन शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. असे असतानाही चामोर्शी तालुक्यातील अड्याळ येथे कोट्यवधी रुपयांचे धान उघड्यावरच सडत असून यावर पाळीव प्राणी डल्ला मारत असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply