चेन्नई : २१ एप्रिल – भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. परंतु आयपीएलच्या चौदाव्या हंगामामध्ये बुमराहच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात बुमराहने १९व्या षटकात दोन नो बॉल टाकत आपल्या नावावर लाजिरवाणा विक्रमाची नोंद करून घेतली. बुमराहने आयपीएलमध्ये सर्वांधिक नो बॉल टाकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करून घेतला. आतापर्यंत बुमराहने आयपीएलमध्ये २५ नो बॉल टाकले आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने यापूर्वी आयपीएलमध्ये २३ नो बॉल टाकले होते. यापाठोपाठ अमित मिश्राने २१ नो बॉल टाकले आहेत. तर इशांत शर्मानेही २१ नो बॉल टाकण्याचा विक्रम नोंदवला होता. उमेश यादवच्या नावावर १९ नो बॉल आहेत.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने २० षटकात ९ बाद १३७ धावा केल्या. यात रोहित शर्मा (४४), सूर्यकुमार यादव (२४), इशान किशन (२६) व जयंत यादव (२३) यांनी आपले योगदान दिले. पण हार्दिक पांड्या व कृणाल पांड्या हे चुकीचे फटके मारून बाद झाले. यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अनुभवी अमित मिश्राने २४ धावांत ४ विकेट्स घेत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. त्याला आवेश खानने २ षटकांत १५ धावांत २ विकेट्स घेत चांगली साथ दिली.
मुंबईने दिलेल्या १३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन (४५), स्टीव्ह स्मिथ ३३), ललित यावद (नाबाद २२) आणि शिमरोन हेटमायर (नाबाद १४) यांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. मुंबई इंडियन्सचे ९ बाद १३७ धावांचे आव्हान दिल्लीने १९.१ षटकांत ४ बाद १३८ धावा करून सहज पार पाडले.