नागपूर : २० एप्रिल – लसींचा तुटवडा असल्याने सध्या राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. लस उपलब्ध होत नसल्याने अनेक लसीकरणं केंद्र बंद ठेवण्याचे वेळ प्रशासनावर आली असताना सोमवारी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याच्या फोटोची चर्चा रंगली होती. यामध्ये तन्मय फडणवीस लसीचा डोस घेताना दिसत आहे. सध्या देशभरात ४५ वर्षाच्या पुढील लोकांना लसीकरणासाठी परवानगी असतानाही पात्र नसणाऱ्या तन्मय फडणवीसला लस कशी काय देण्यात आली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी करोना लसीकरणासाठी असणाऱ्या नियमांचं पालन केलं पाहिजे याबाबत दुमत नसून कोणालाही चुकीच्या पद्धतीने ते करण्याची परवानगी देता कामा नये असं म्हटलं आहे.
तन्मय फडणवीसच्या फोटोवरुन झालेल्या वादावर स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ”तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे”.
“पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.