वर्ध्यात आरोग्यसेवेचे वाजले तीनतेरा

वर्धा : १९ एप्रिल – वर्धा जिल्ह्यात आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर 2 तास मृतदेह दारात पडून होता. मात्र, त्याला उचलायला कुणी तयार नव्हते. अखेर नातेवाईकानी मृतदेह गाडीत टाकून घर गाठल्याची घटना वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उघडकीस आली.
जिल्ह्याच्या शिरपूर येथील रुग्णाला ताप आला म्हणून १७ तारखेला जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्रीला भरती करण्यात आले होते. रात्रभर त्याच्यावर उपचार केला नसल्याने सकाळच्या सुमारास मृत्यू झाला, असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सकाळी त्याचा मृत्यू झाल्यानंतर बराच काळ मृतदेह बेडवरच पडून होता. त्यानंतर त्याला कोविडच्या किटमध्ये रॅप करण्यात आले. मृतदेह उचलायला कुणीच तयार नव्हते. अखेर नातलगांनी मृतदेहाला बाहेर काढले.
मात्र, रुग्णवाहिका नसल्याने यात दोन तासाचा अवधी निघून गेला. परंतु, संतप्त झालेल्या परिवाराला सांत्वना देण्यासाठी आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी तिथे आला नव्हता. मरगळ आलेल्या वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णासोबत आता मृतदेहाची सुद्धा अवहेलना केली जात आहे. मात्र मुर्दाड प्रशासन आणि त्यातील अधिकारी यांच्यातील माणुसकी मेली काय असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply