महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अचानक दिली मेळघाटला भेट, महिला वनकर्मचाऱ्यांशी साधला संवाद

अमरावती : १९ एप्रिल – राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या आज अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आल्या आहेत. वन अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या मृत्यूनंतरचा यशोमती ठाकूर यांचा हा पहिलाच दौरा आहे. हा दौरा त्यांनी गोपनीय ठेवला होता. अचानक मेळघाटात येऊन त्यांनी महिला वन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली. खास करून वरिष्ठांकडून त्रास होत नाही ना, चांगली वागणूक मिळते ना आदी बाबींची त्यांनी विचारपूस केली. मात्र, ठाकूर यांच्या या अचानक झालेल्या दौऱ्याने वन विभागातील अधिकारी वर्गाची चांगलीच पळापळ झाली.
महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही अपप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा संवाद राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांशी साधला. मेळघाटातील वन अधिकारी दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर येथील महिला अधिकारी व कर्मचारी पार खचून गेल्या होत्या त्यामुळे दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर यशोमती ठाकूर यांचा हा दौरा महत्त्वाचा होता.
मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी, वरिष्ठांकडून होणारा जाच आदींबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी मेळघाटातील दुर्गम भागातील विविध ठिकाणी सतत दोन दिवस गोपनीय दौरा केला व महिला वनकर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे मनोबल वाढविले. यावेळी त्यांनी या महिला कर्मचाऱ्यांकडून दिपाली चव्हाण यांच्याबाबतची माहितीही घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. ठाकूर यांच्या या अचानक झालेल्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले होते.
दिपाली चव्हाणने आत्महत्या केली. हा प्रकार धक्कादायक होता. त्यामुळे या महिलांशी संवाद साधला पाहिजे, असं मला वाटलं. ते माझं खातं आहे आणि कर्तव्यही आहे. या महिला काम करतात, त्यांचा मानसिक छळ होतो का? त्यांना रात्र जंगलात घालावी लागते, त्या सुरक्षित आहेत का? त्यांच्यासोबत नेमकं काय होतं? त्या कशा प्रकारे राहतात? म्हणून त्यांच्यासोबत बैठका घेतल्या. सर्व डिव्हिजनमध्ये गेलो आणि त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. विनोद शिवकुमार रुद्र या व्यक्तिच्याच विभागात महिलांना आणि पुरुषांचाही मानसिक छळ होत असल्याचं दिसून आलं, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. दिपाली आपल्यातून गेली. परंतु, या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही गेलो आणि या महिलांच्या सोयी सुविधांचीही माहिती घेतली, असं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply