मुंबई : १९ एप्रिल – अभिनेता प्रभास फिल्मी जगतातला असा कलाकार आहे, जो केवळ आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकतो, इतकेच नाही तर जेव्हा जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला त्याची गरज पडते, तेव्हा तो त्यांना मदत देखील करतो. जर असे म्हटले की आजच्या काळात प्रभासपेक्षा नम्र आणि दयाळू इतर कोणताही कलाकार नाही, तर कदाचित ही गोष्ट चुकीची ठरणार नाही. नुकतीच प्रभासच्या या स्वभावाची प्रचीती पाहायला मिळाली. मृत्युच्या दाराशी असलेल्या चाहत्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रभास चित्रीकरण सोडून थेट रुग्णालयात पोहोचला होता.
प्रभासची ही भेट त्याच्या लाखो चाहत्यांची मने जिंकत आहे. ही घटना नुकतीच प्रसिद्ध उद्योजक वेंपा कासी राजू यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितली आहे. उद्योजक असणारे राजू हे प्रभासचे मूळ शहर भीमावरम मधून आहेत. या घटनेचा संदर्भ देताना राजू म्हणाले की, प्रभासच्या या कृतीने सर्वांचे हृदय जिंकले आहे.
प्रभासने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो या भूमीशी नाळ जोडलेला एक सच्चा माणूस आहे, जो सर्वांना मदत करण्यास सदैव तत्पर असतो. राजूने सांगितले की, हा चाहता दुसरा कोणी नाही तर राजू यांचा नातेवाईक होता. 20 वर्षीय मुलगा कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात या आजाराशी झुंज देत होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत्यू आधी एकदा प्रभासला भेटायचं आहे, अशी शेवटची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
प्रभासला या मुलाच्या प्रकृतीची माहिती समजताच, त्यांने अजिबात वेळ न दवडता थेट रुग्णालयात धाव घेतली. यावेळी प्रभास एका चित्रीकरणात व्यस्त होता, मात्र चित्रपटाचे शूटिंग सोडून तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. मुलाच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर एका तासाभरात प्रभास त्याच्या समोर उभा होता. प्रभासने अतिशय प्रेमाने त्याचे चुंबन घेतले आणि एक तास वेळ त्याच्याबरोबर घालवला.
राजू यांनी सांगितले की, हा मुलगा पुढच्या अक्षरशः मृत्युच्या दारात उभा होता. पण, प्रभासची भेट घेतल्यानंतर तो पुढचे दहा दिवस जगला. इतकेच नाही तर प्रभास या गोष्टीसाठीही तयार होता की, जेव्हा जेव्हा या मुलाला प्रभासला भेटायचे असेल तेव्हा तो ताबडतोब त्याला भेटायला रुग्णालयात हजार होईल. शेवटी राजू म्हणाले की, प्रभासच्या या स्वभावामुळेच त्याला मनोरंजन विश्वातील सर्वात लाडका अभिनेता का म्हटले जाते, ते स्पष्ट होते.