कोळसा खाण सुरु व्हावी यासाठी झाडावर चढून आत्महत्या करण्याची भाजप पदाधिकाऱ्याने दिली धमकी

चंद्रपूर : १९ एप्रिल – भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा कोळसा खाण पुन्हा सुरू होऊन चार महिन्यांच्या कालावधी लोटला तरी प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्याने भाजपा पदाधिकाऱ्याने तहसील कार्यालयातील झाडावर चढून वीरुगिरी केली.
भद्रावती शहरापासून जवळच असलेल्या कर्नाटका एम्टा कोळसा खाणीत बरांज येथील शेतकर्यांच्या जमिनी गेल्या. ही खदान बरेच दिवसापर्यंत बंद होती. अगदी अलीकडेच चार महिन्यापूर्वी सुरू झाली. परंतु, प्रकल्पग्रस्तांना प्रति सातबारा ५ लाख रूपये व १८० जुन्या कामगारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली नाही. या दोन प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांना घेऊन भद्रावती तालुका भाजपाचे महामंत्री नरेंद्र जिवतोडे हे तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारा जवळील उंच झाडावर चढले.
यावेळी त्यांचा गळ्यात गळफास व सोबत पेट्रोलची शिशी आणि आगडब्बी होती. मागण्या मान्य झाल्या नाही, तर गळफास किंवा आत्मदहन करू, असा इशारा प्रशासनाला त्यांनी दिला होता. यावेळी कोळसा खाण परिसरात भद्रावती पंचायत समितीचे सभापती तथा प्रकल्पग्रस्त प्रविण ठेंगणे, बरांज ग्राम पंचायतीच्या सरपंच मनिषा ठेंगणे आणि इतर प्रकल्पग्रस्तांनी कोळसा खाण काम बंद पाडली. ही बाब आमदार सुधीर मुनगंटीवार यांना माहिती होताच ते येथील तहसील कार्यालयात उपस्थित झाले व त्यांनी जिवतोडे यांना खाली उतरण्याचे आवाहन करून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यानंतर तहसीलदार महेश शितोडे, कर्नाटक एम्टा कंपनीचे अधिकारी राजेश वासाडे यांच्यासोबत चर्चा करून जुन्या कामगारांना नियुक्ती पत्र त्वरीत देण्याच्या सुचना दिल्या. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी उच्चस्तरिय बैठक लावून सर्व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवून घेऊ, असे आश्वासन दिले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply