इस्रायलमध्ये आली कोरोनास्थिती नियंत्रणात

नवी दिल्ली : १९ एप्रिल – भारतात करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लॉकडाउनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत ६ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. महाराष्ट्रातही ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तर काही राज्यांनी आठवडी लॉकडाऊन आणि नाइट कर्फ्यूची घोषणा केली आहे. असं असताना भारताच्या तुलनेत इतर देशांमध्ये स्थिती नियंत्रणात येत असल्याचं दिसत आहे. इस्रायलनं तर आता सार्वजनिक ठिकाणी आणि खुल्या शाळांमध्ये मास्क बंधनकारक नसेल असं जाहीर केलं आहे. लसीकरणाच्या जोरावर इस्रायलने हे करुन दाखवलं आहे.
इस्रायलमध्ये लसीकरणाच्या जोरावर करोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यात आला आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक नसेल. मात्र बंदिस्त ठिकाणी आणि गर्दी होण्याऱ्या कार्यक्रमात मास्क घालणं बंधनकारक असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच शिक्षण संस्थाही पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर खुल्या शाळांमध्ये मास्क घालण्यास कोणतंही बंधन नसेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच विदेशी पर्यटकांचं येत्या मे महिन्यापासून लसीकरण करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी इस्रायलमध्ये ८ लाख ३६ हजार लोकांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यापैकी ६ हजार ३३१ जणांचा करोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे खडबडून जागं झालेल्या प्रशासनाने लसीकरणावर जोर दिला. देशातील एकूण लोकसंख्येपैकी ५३ टक्के जनतेचं लसीकरण केल्याचं आरोग्यमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलं आहे. जवळपास ५३ टक्के नागरिकांना करोना लसीचा दूसरा डोस देण्यात आला आहे. या लसींमध्ये पी फायझर आणि बायो एनटेक लसींचा समावेश आहे
इस्रायलनं मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात लसीकरण मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर मृत्यूचा आकडाही कमी झाला आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply