कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राहुल गांधींनी केल्या बंगालमधील प्रचारसभा रद्द


नवी दिल्ली : १८ एप्रिल – देशात अत्यंत वेगानं पसरणारा कोरोनाचा संसर्ग पाहता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच त्यांनी इतर सर्व नेत्यांनाही आवाहन केलं की, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, सर्वांनी प्रचारसभा रद्द कराव्या.
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये मात्र प्रचंड गर्दीच्या सभा होत आहेत. या सभांवरून विविध स्तरातील लोक राजकीय पक्ष आणि नेत्यांवर टीका करत आहेत. कोरोनाला निवडणुका असलेल्या राज्याचं वावडं आहे का? असा सवाल विचारला जाऊ लागला होता. हजारोंच्या संख्येनं येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रचंड धोका असल्यानं राजकीय पक्षांवर टीका होत होती. मात्र तरीही त्यात फारसा फरक पडला नाही. पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या आगामी टप्प्यांसाठी प्रचार ऐन रंगात आलेला आहे. पण असं असतानाही राहुल गांधी यांनी अखेर पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या सर्व सभा रद्द केल्या आहेत.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. कोविडचं संकट पाहता पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलं. तसंच अशा संकट काळात या सभांमुळं जनता आणि देशाला किती धोका निर्माण होऊ शकतो, याचा राजकीय पक्षांनी विचार करावा असं आवाहनही राहुल गांधींनी केलं आहे.

Leave a Reply