केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांची उद्धव ठाकरेंशी झाली चर्चा


मुंबई : १८ एप्रिल – राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. यादरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.
राज्यातील बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करत आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत अखेर चर्चा झाली आहे.
या चर्चेत राज्यातील ऑक्सिजनच्या तुडवड्याबाबत दोघांमध्ये बातचीत झाली. या संकटाचा सामना करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, योग्य वर्तन आणि लसीकरण या पाच स्तंभांवर लक्ष केंद्रीत करण्याचा पुनरुच्चार केल्याचंही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. सर्वौत्तोपरी महाराष्ट्राला सहकार्य करण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी आश्वासन दिले आहे.
दरम्यान, देशभरात उद्भवलेल्या कोविड-19 साथीच्या आजाराची परिस्थिती हाताळण्यासाठीच्या सज्जतेचा सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक आयोजित केली. या बैठकीत औषधे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि लसीकरणाशी संबंधित विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.
मागील वर्षी भारताने एकत्रितपणे कोविडचा मुकाबला केला होता आणि आता संपूर्ण देश पुन्हा त्याच तत्त्वांनी परंतु अधिक वेगाने कोविडला हरवू शकतो, असे पंतप्रधान म्हणाले.
टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंटला पर्याय नाही, यावर पंतप्रधानांनी भर दिला. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रारंभिक चाचणी आणि योग्य ट्रॅकिंग महत्त्वपूर्ण आहे. स्थानिक प्रशासनाने लोकांच्या समस्यांप्रती संवेदनशील असणे आवश्यक आहे, असंही पंतप्रधान म्हणाले.

Leave a Reply