‘हॅरी पॉटर’ चित्रपटातील अभिनेत्री हेलेन यांचे निधन

‘हॅरी पॉटर’ चित्रपटांच्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हेलेन यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ५२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हेलेन या कर्करोगाशी झुंज देत होत्या. शुक्रवारी हेलेन यांचे पती डेमियन लुइस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे हेलेन यांचे निधन झाल्याची माहिती दिली. हेलेनच्या निधनानंतर हॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
डेमियन लुइस यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटले, ‘मला सांगताना अतिशय दु:ख होत आहे की माझी पत्नी हेलेनचे निधन झाले आहे. तिने राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. मी स्वत:ला भाग्यवान समजेन की ती आमच्या आयुष्यात होती.’
हेलेनच्या निधनानंतर सोशल मीडिया पोस्टद्वारे अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिवूड दिग्दर्शक हंसल मेहताने देखील ट्वीट करत हेलेनला श्रद्धांजली वाहिली आहे. ‘ही अतिशय दु:ख बातमी आहे’ असे हंसल यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
हेलेन या हॉलिवूड इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी हॅरी पॉटर चित्रपटाच्या मालिकांमध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्यांनी ‘पीकी ब्लाइंडर्स’, ‘स्कायफॉल’, ‘ह्यूगो’, ‘द क्वीन’ आणि ‘द स्पेशल रिलेशनशिप’मध्ये काम केले आहे.

Leave a Reply