महाराष्ट्रापाठोपाठ राजधानी दिल्ली करोनाचा हॉटस्पॉट

नवी दिल्ली : १७ एप्रिल – प्रचंड रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधा कमी पडत आहेत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. तर दुसरीकडे निर्बंधांच्या भीतीने नागरिकांचे हाल होत आहे. पूर्वेकडील राज्यांमध्येही हळूहळू निर्बंध कडक केले जात असून, यासंदर्भात राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट केलं आहे. हे ट्विट करताना गेहलोत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिय गांधी यांच्या विधानाचा हवाला दिला आहे.
देशात करोनामुळे भयावह स्थिती निर्माण होताना दिसत आहे. कुठे बेडसाठी रांगा लागलेल्या दिसत आहे. तर कुठे अंत्यसंस्कार करण्यासाठी. दिल्लीबरोबरच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात यांसारख्या राज्यातील स्थिती बिकट होत असल्याचं दिसत आहे. या स्थितीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून पंतप्रधानांचं लक्ष वेधलं आहे.
“काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी बरोबर म्हणतात की, करोना संक्रमणाच्या प्रसारासाठी आम्ही राजकीय नेतेही काही प्रमाणात दोषी आहोत. आता करोना नव्या रुपात प्रकट झाला आहे आणि देशात भयावह स्थिती निर्माण होत चालली आहे. इतकंच नाही, तर कर्फ्यू आणि लॉकडाउनसारखे निर्णय घ्यावे लागत आहेत. पंतप्रधानांनी पूर्वीप्रमाणेच राज्यांसोबत चर्चा करायला हवी,” असं गेहलोत यांनी म्हटलं आहे.
राजधानी महाराष्ट्रापाठोपाठ राजधानी दिल्ली करोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. १७ हजार उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवल्यानंतर दिल्लीत शुक्रवारी नव्या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली. दिल्लीत शुक्रवारी १९ हजार ४८६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिल्लीत वीकेंड लॉकडाउन लागू करण्यात आलेला आहे. दुसरीकडे राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही वीकेंड लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे.
करोनाचा कहर अन् प्रचाराचा धडाका…
पश्चिम बंगालमध्ये करोनाचा कहर सुरू असला तरी विधानसभा निवडणुकांचा प्रचारही धूमधडाक्यात सुरू आहे. पश्चिाम बंगालमध्ये गेल्या २४ तासांत सहा हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली. आणखी तीन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. त्यामुळे या रणधुमाळीनंतर राज्यात करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची भीती आहे. महाराष्ट्रामध्ये दैनंदिन वाढ ६० हजारांच्या आसपास होत आहे. पश्चिम बंगालमध्ये इतकी रुग्णवाढ झाली तर राज्यात हाहाकार माजेल, पण प्रचार करण्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व्यग्र असल्याने करोनाच्या आपत्तीचे कोणाला काहीही देणेघेणे नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया माकपच्या एका कार्यकर्त्याने दिली.

Leave a Reply