गतिमंद मुलीचे अपहरण करून तिच्यावर कारमध्ये अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

नागपूर : १७ एप्रिल – १७ वर्षीय गतिमंद मुलीचे अपहरण करून तिच्यावर कारमध्ये अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल करून ओला कॅब चालकाला अटक केली आहे. विश्वास लक्ष्मीकांत मंडल (३३) रा. ओंकारनगर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडित १७ वर्षीय मुलगी ६ एप्रिलला आईसह मेडिकलमध्ये आली. यावेळी ती आईचा हात सोडून बेपत्ता झाली. ती मेडिकल चौकात आली. येथे विश्वास कारमध्ये बसला होता. मला फिरवून आण, असे ती विश्वास याला म्हणाली. विश्वास तिला घेऊन वाडी येथे गेला. तेथील जंगलात कारमध्येच तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो तिला घेऊन शिवणगाव येथे गेला. तेथून त्याने मुलीला रेल्वेस्थानकावर सोडले. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. बेलतरोडी पोलिसांनी ती बेपत्ता असल्याची नोंद घेतली.
मुलगी गोंदियाला जाणाऱ्या रेल्वेत बसली. तिने एका प्रवाशाच्या मोबाईलवरून आईच्या मोबाईलवर संपर्क साधला. मुलीच्या आईने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मोबाईल क्रमांकाच्या आधारे मुलीचे लोकेशन शोधले. ती गोंदियाला जाणार असल्याचे समजात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाच्या मदतीने मुलीला गोंदिया रेल्वेस्थानकावर उतरवले.
चौकशीदरम्यान कॅब चालकाने अत्याचार केल्याचे तिने सांगितले. पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय आकोत यांनी लगेच चालकाचा शोध सुरू केला आणि सखोल तपासाअंती आरोपीला अटक केली.

Leave a Reply