नवी दिल्ली :१६ एप्रिल – देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाही, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ही परिस्थिती देशातील अनेक राज्यांमध्ये आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आढावा बैठक घेतली. त्यांनी सध्याच्या ऑक्सिजन साठा, निर्मिती आणि पुरवठ्याची माहिती घेतली. यावेळी बैठकीला आरोग्य मंत्रालय, स्टील मंत्रालय, रस्ते आणि परिवहन मंत्रालयासह विविध विभागाचे मंत्री आणि अधिकारी सहभागी झाले होते. पंतप्रधानांनी सर्व मंत्रालयांना राज्य सरकारांसोबत योग्य प्रकारे समन्वय साधण्याचे निर्देश दिले. पंतप्रधानांना सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. राज्य आणि वाहतूकदारांना ऑक्सिजनची ने-आण करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असं आश्वासन दिल्याचं मोदींना सांगण्यात आलं. शिफ्टमध्ये ड्रायव्हर्सची ड्युटी लावून २४ तास टँकरसह सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर सिलेंडर भरले जाणाऱ्या प्लांटमध्ये २४ तास काम सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे.
पंतप्रधानांनी कोरोनाने सर्वाधिक त्रस्त असलेल्या १२ राज्यांमध्ये पुढील१५ दिवस ऑक्सिजन पुरवठा कसा होईल याची माहिती घेतली. प्रत्येक ऑक्सिजन प्लांटची क्षमता वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या टँकर्सवर कोणतेही निर्बंध घालू नका, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
000000000000000000