नवी दिल्ली : १६ एप्रिल – देशातील कोरोनाची वाढती प्रकरणं लक्षात घेता इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) चांगला पुढाकार घेतला आहे. देशभरात पसरलेल्या डॉक्टरांच्या या संघटनेने कोविड हेल्पलाइन सुरू केली आहे. या माध्यमातून रूग्णांना 24 तास मदत पुरविली जाईल. विशेष गोष्ट अशी आहे, की ही हेल्पलाइन चालवणारा सुमारे 250 डॉक्टरांचा स्टाफ कोरोनासंबंधी सर्व प्रकारची मदत पुरवेल.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जे ए जयलाल यांनी सांगितलं, की आयएमएनं 95975757454 या नंबरवरुन हेल्पलाइन जारी केली आहे. देशभरातील लोक या नंबरवर कॉल करून कोरोनासंबंधीची (सर्व माहिती घेऊ शकतात. या हेल्पलाइनमध्ये अशी व्यवस्था केली गेली आहे, जेणेकरुन लोकांना प्रत्येक स्थितीमध्ये मदत करणं शक्य होईल.
या हेल्पलाइनच्या माध्यमातून रुग्णालयांमधील कोरोना बेडपासून व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची सुविधा, सेल्फ किंवा होम क्वारंटाईनच्या वेळी घ्यावयाची काळजी, कोरोना झाल्यास घरीच करायचे उपाय, लसीबद्दलची जागरुकता, छोट्या घरांमध्ये रुग्ण आणि कुटुंबीयांनी घ्यावयाची काळजी, अशाप्रकारच्या लोकांच्या अनेक शंकांचं निराकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
देशात कोरोनाचा प्रसार वेगानं वाढत आहे. गुरुवारी देशात जवळपास दोन लाख 17 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातही महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक यासारख्या राज्यांमधील परिस्थिती अधिक भयंकर आहे.