रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आणि आरोग्य व्यवस्था खिळखिळी यामुळेच लॉकडाऊन

मुंबई: १५ एप्रिल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर अखेर महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर मागील वर्षीही कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. तेव्हा अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडल्यास पोलिसांकडून नागरिकांना चांगलाच प्रसाद दिला जात असे. आताच्या लॉकडाऊनमध्येही तसंच होणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. यावेळी राज्यात लॉकडाऊन करण्यास समाजातील अनेक घटकांचा विरोध होता. मात्र कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आणि आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली. परिणामी सरकारला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. लॉकडाऊनमुळे आधीच लोकांची नाराजी ओढावलेली असताना पुन्हा आक्रमक कारवाई केल्यास या नाराजीत भर पडू शकते. त्यामुळे आता करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अजून तरीही पोलीस प्रशासन सौम्य भूमिकेत असल्याचं दिसत आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात पोलीस नागरिकांना विनंती करताना पाहायला मिळतील. मात्र तरीही अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी न झाल्यास मात्र पोलीस पुन्हा एकदा कडक कारवाई करण्यास सुरुवात करतील, अशी शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
‘गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आत्ताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ‘ब्रेक दि चेन’ मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले.
प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ‘आपण कडक निर्बंध लावले आहेत त्याची चांगली अंमलबजावणी होईल हे पाहताना आपला मुख्य उद्देश हा कोविडची संसर्ग साखळी तोडणे हा आहे हे लक्षात ठेवावे आणि कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये, कोणतीही शंका असल्यास मंत्रालयाला तातडीने मार्गदर्शन मागावे.’

Leave a Reply