राज्यसरकारचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक – देवेंद्र फडणवीस

नागपूर : १४ एप्रिल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांची संचारबंदी व कडक निर्बंध जाहीर केले आहेत. त्याचवेळी विविध घटकांसाठी ५ हजार ४७६ कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले असून त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई-पुणे या व्यतिरिक्तही महाराष्ट्र आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावली आहे.
‘मुंबई आणि पुणे ही महत्त्वाची शहरं आहेतच आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे हे या सरकारला माहितीच नाही. त्यामुळं नागपूर, नाशिक, औरंगाबाद येथे आरोग्य व्यवस्था वाढवण्यासंदर्भात सरकारकडून काहीच कृती होताना दिसत नाहीये. गेल्यावेळीही नागपूरला कोणतीही व्यवस्था केली नाही, आजही नागपूरती स्थिती वाईट आहे. म्हणूनच मी आज नागपूरला आलो आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. ऑक्सिजनचं व्यवस्थापन करण्यात सरकार अपयशी होत असून त्याकडे लक्ष दिलं पाहिजे,’ याकडेही देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं आहे. राज्य सरकारला ऑक्सिजनच्या वाहतुकीचे व्यवस्थापन जमत नाही. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले
‘सरकारने जाहीर केलेले पॅकेज ही निव्वळ धुळफेक आहे. याचं कारण म्हणजे ३३०० कोटींची तरतूद करोनासंदर्भात सांगण्यात आली ते नियमित बजेटमधील तरतूद आहे. जी वर्षभरात खर्च होणार आहे. त्यामुळं सध्या वाढणाऱ्या करोनासाठी ही तरतूद नाही,’ अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
‘सरकारने फेरीवाल्यांना मदत करु असं सांगितलं आहे. नोंदणीकृत असा उल्लेख केल्याने याचा उपयोग फक्त मुंबई आणि ठाण्यापुरता होणार आहे. याशिवाय रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना परवानगी दिली आहे. संचारबंदी लावल्याने त्यांच्याकडे येणार कोण? पार्सल देण्याची त्यांच्याकडे काय व्यवस्था आहे. असती तर त्यांनी हॉटेलच उघडलं असतं,’ अशा शब्दांत सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर त्यांनी टीका केली.

Leave a Reply