राजस्थान रॉयल्सचा महत्वाचा खेळाडू बेन स्टोक्स आयपीएल मधून बाहेर

मुंबई : १४ एप्रिल – राजस्थान रॉयल्सला यंदाच्या आयपीएल मोसमात दुसरा धक्का बसला आहे. जोफ्रा आर्चरनंतर आता त्यांचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू बेन स्टोक्स आयपीएलमधून बाहेर झाला आहे. हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे स्टोक्सला आयपीएलला मुकावं लागणार आहे. याआधी जोफ्रा आर्चर हातावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे बाहेर झाला होता. राजस्थान रॉयल्सचा पंजाबविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला होता.
वृत्तानुसार क्रिस गेलचा कॅच पकडत असताना बेन स्टोक्सला दुखापत झाली होती. त्याआधीही स्टोक्सने एक कॅच सोडला होता. लॉन्ग ऑनवर फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या स्टोक्सने धावत गेलचा कॅच पकडला होता, यानंतर तो मैदानातच पडला. तेव्हाच त्याला दुखापत झाली, पण तरीही तो उरलेली मॅच खेळला. बॅटिंग करत असताना स्टोक्स तीन बॉल खेळून शून्य रनवर आऊट झाला. मोहम्मद शमीने त्याला माघारी पाठवलं.
मिळालेल्या माहितीनुसार बेन स्टोक्स एक आठवडा भारतामध्येच राहिल. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात स्टोक्सच्या दुखापतीवरुन चर्चा सुरू आहे. गुरूवारी स्टोक्सचा एक्स-रे काढण्यात येईल. यानंतर त्याच्या दुखापतीबाबत माहिती मिळेल, तेव्हा इंग्लंड क्रिकेट बोर्ड निर्णय घेईल. भारताविरुद्धच्या सीरिजवेळी जोफ्रा आर्चरला दुखापत झाली होती. यावर्षी भारतात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्यामुळे स्टोक्सबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्ड कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 4 रनने पराभव झाला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने वादळी शतक केलं, पण त्यांना पंजाबचं आव्हान पार करता आलं नाही. पंजाबने या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 221 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 7 विकेटच्या मोबदल्यात 217 रन केले. सॅमसनने 63 बॉलमध्ये 119 रनची अफलातून खेळी केली. आता राजस्थानची पुढची मॅच 15 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे.

Leave a Reply